
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 2020-21 मध्ये फळबाग लागवडीचे 50.53 टक्के उद्दिष्ट साध्य झाले.
काशीळ (जि. सातारा) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 2020-21 मध्ये फळबाग लागवडीचे 50.53 टक्के उद्दिष्ट साध्य झाले. जिल्ह्यात यंदा 3,760 हेक्टरवर फळबाग लागवडीचे लक्ष होते. त्यापैकी 1915.28 हेक्टरवर फळबाग लागवड झाली. त्यामध्ये खटाव तालुक्याने आघाडी घेतली आहे.
फलोत्पादन संचालनालय, ग्रामपंचायत व कृषी विभागातर्फे वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी पडीक जमीन, सलग जमीन व बांधावर फळबाग लागवडीसाठी "मनरेगा'तून प्रोत्साहन देण्यात येते. फळबाग लागवड योजनेंतर्गत आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्री, मोसंबी, लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कोकम, फणस, अंजीर, सुपारी या फळझाडांची लागवड करण्यात येत आहे. लागवडपूर्व मशागत, लागवड, संगोपन करण्यासाठी मजुरी, रोपे, खते यासाठी तीन वर्षांच्या कालावधीमध्ये पीकनिहाय निधी दिला जातो. या योजनेतून बांधावर फळ लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे.
हे पण वाचा- थोडं फार होणारच! उदयनराजेंनी गृहराज्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोडले मौन
जिल्ह्यात यंदा 3,760 हेक्टरवर फळबाग लागवडीचे लक्ष होते. त्यापैकी 2,697 शेतकऱ्यांनी 1915.28 हेक्टरवर फळबाग लागवड केली असून, उद्दिष्टाच्या 50 टक्के क्षेत्र साध्य झाले आहे. खटाव तालुक्यात सर्वाधिक 892 शेतकऱ्यांनी 390.58 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. तालुकानिहाय लागवड क्षेत्र (हेक्टर) ः सातारा 146.32, कोरेगाव 200.25, खटाव 390.58, वाई 160.89,महाबळेश्वर 70.45, खंडाळा 136,72, जावळी 62.07, कऱ्हाड 178.33, पाटण 184.84, फलटण 255.08, माण 129.75.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे