
सातारा : दर वर्षीप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी यंदा जुलै, ऑगस्टमध्ये दहा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट राज्य सरकारने विविध विभागांना दिले आहे. या उद्दिष्टांपैकी जिल्ह्यात ५० लाख वृक्ष लागवड व संगोपन करण्याचे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले आहे. त्यांनी विविध विभागांना या उद्दिष्टांचे वाटप केले असून, सर्वाधिक उद्दिष्ट रेशीम विभागाला १८ लाख, तर वन विभागाला दहा लाख वृक्ष लागवड करण्याचे आहे. ही उद्दिष्ट पूर्तीसाठी सामाजिक वनीकरण, वन विभागाकडून विविध रोपे उपलब्ध केली जाणार आहेत. यासाठी शासकीय विभागांना उपलब्ध होणाऱ्या निधीच्या ०.५ टक्के निधी यासाठी खर्च करता येणार आहे. रोप लागवड केलेल्या स्थळाची नोंदणी आणि जिओ टॅगिंग वन विभागाच्या संकेतस्थळावर करावी लागणार असल्याने फोटोसाठी रोप लागवड करणाऱ्यांची अडचण होणार आहे.