सातारा : अजिंक्‍यतारा रोप-वे प्रकल्‍प केंद्राच्‍या निधीतून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadkari

सातारा : अजिंक्‍यतारा रोप-वे प्रकल्‍प केंद्राच्‍या निधीतून

सातारा : अजिंक्यताऱ्यावरील मंगळाईदेवी परिसर ते खालची मंगळाई मंदिर परिसर या हवाई मार्गावर रोप-वे उभारण्याचे निश्‍चित केले आहे. डबल केबलद्वारे या दोन्ही ठिकाणांच्या परिसरात एकाच वेळी दोन्ही बाजूंकडून आठ आसनक्षमतेच्या दोन रोप-वे ट्रॉली ये-जा करतील. त्‍यासाठी आवश्‍‍यक जागा उपलब्‍ध असून, ९२ कोटींच्‍या केबल रोप-वे प्रकल्पाची उभारणी केंद्राच्या निधीतून करण्‍याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. लवकरच केंद्र तसेच पालिकेच्‍या माध्‍यमातून अजिंक्यतारा रोप-वेच्या उभारणीस सुरुवात होईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.

दिल्ली येथे आज उदयनराजे यांनी भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग वाहतूक मंत्री गडकरी यांची भेट घेत रोप-वे प्रकल्‍पाबाबत चर्चा केली. या वेळी उदयनराजे म्‍हणाले,‘‘अजिंक्यतारा किल्‍ल्‍यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे अल्‍पकाळ वास्तव्य होते. या किल्‍ल्यावरील तळी पर्यावरण, इतिहासप्रेमींच्‍या मदतीने पुनरुज्‍जीवित केली जाणार आहेत. किल्‍ल्यावरील ऐतिहासिक वास्‍तूंचे अवशेष तसेच राजसदर चौथरा अद्यापही सुस्‍थितीत आहे.

किल्‍ल्‍याचा विस्‍तार ७० एकरांत असून, अजिंक्यतारा सातारकरांचा अभिमान आहे. राज्‍यभरातील पर्यटक अजिंक्यतारा किल्‍ल्यास भेट देण्यास उत्सुक असतात. दरवाजापासून चढण, पायऱ्या असल्‍याने वृध्‍द नागरिकांना किल्‍ल्‍यावर जाता येत नाही. यामुळे रोप-वेचा प्रस्‍ताव केल्‍याची माहिती श्री. गडकरी यांना दिली.’’

मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या अजिंक्यताऱ्यावर रोप-वेची उभारणी केंद्राच्या निधीमधून करण्याची ग्‍वाही श्री. गडकरी यांनी दिल्‍याची माहिती उदयनराजेंनी पत्रकात दिली आहे.

Web Title: Satara Ajinkyatara Rope Way Project Funded Centre

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top