
सातारा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अजिंक्यताऱ्यावर लेझर शो
सातारा : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने येथील पालिकेने १३ ते १५ ऑगस्टदरम्यान अजिंक्यतारा किल्ल्यावर लेझर शोचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची प्रशासकीय तयारी सध्या सुरू असून या शोमुळे अजिंक्यतारा किल्ल्याचा दर्शनी भाग ऐतिहासिक प्रसंगांनी उजळून निघणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र तसेच राज्य सरकारने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये हर घर तिरंगा, आजादी की रेलगाडी, स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचे सत्कार, ऐतिहासिक स्थळांची सजावट, रक्तदान, श्रमदान शिबिरांसह सामाजिक, ऐतिहासिक व अन्य उपक्रमांचा सहभाग आहे. याच अनुषंगाने येथील पालिकेने मराठा साम्राज्याच्या राजधानीची ओळख असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ला परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी किल्ल्याच्या दर्शनी भागावर लेझर शो आयोजित करण्यात येणार आहे. लेझरच्या माध्यमातून भारतीय तिरंगा तसेच इतर माहितीपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. संध्याकाळी हा लेझर शो होणार आहे.
त्यासाठीची तयारी पालिकेने सुरू केली आहे. या कामासाठी लेझर शोचे आयोजन करणाऱ्या संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. पालिकेच्या मुख्यालय असणाऱ्या इमारतीवरून अजिंक्यतारा किल्ल्यावर लेझरची विविधरंगी किरणे सोडण्यात येणार आहेत. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी हा शो होणार आहे. यातून भारतीय स्वातंत्र्य, त्याचा इतिहास आदी बाबी सातारकरांना दाखविण्यात येणार आहेत.
यापूर्वी पालिकेने शिवजयंतीनिमित्त अजिंक्यतारा किल्ल्याच्या दर्शनी भागावर लेझर शोचे आयोजन केले होते. याच धर्तीवर होणाऱ्या या शोचा आनंद सातारकरांनी घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.
ऐतिहसिक स्थळांवर रोषणाई
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पालिकेने अजिंक्यतारा किल्ल्यावर लेझर शोचे आयोजन करण्याच्या निर्णयाबरोबरच चारभिंती, हुतात्मा स्मारक तसेच अन्य ऐतिहसिक स्थळे विविधरंगी प्रकाशझोतांनी उजळवण्यात येणार आहेत. यासाठीची तयारीही येथील पालिकेने केली आहे. येत्या काही दिवसांत त्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
Web Title: Satara Ajinkyatare Occasion Amritmahotsava Independence
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..