esakal | Satara: पुण्या, मुंबईप्रमाणे आरोग्य सुविधा द्या : अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार

पुण्या, मुंबईप्रमाणे आरोग्य सुविधा द्या : अजित पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खटाव : प्रदीप विधाते यांच्या प्रयत्नांतून खटावच्या वैभवात भर घालणारी आरोग्य केंद्राची इमारत उभी राहत आहे. ही इमारत सर्व आरोग्य सोयी-सुविधांयुक्त असावी. यासाठी अधिकचा निधी लागला

तरी आम्ही देऊ. त्यासोबतच आवश्यक तेवढे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी देण्याचा प्रयत्न करू. मात्र, खटावसह परिसरातील नागरिकांना मुंबई, पुण्याच्या धर्तीवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, लक्ष घालून विशेष प्रयत्न करावेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा: सातारा : कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या शिरला गावात

येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील माने, मानसिंगराव जगदाळे, मंगेश धुमाळ, सुरेंद्र गुदगे, सोनाली पोळ, कल्पना खाडे, जयश्री कदम, सुनीता कचरे, इंदिरा घार्गे, तेजस शिंदे, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,‘‘ खटाव तालुक्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या जिहे-कठापूर योजनेचे काम आमच्या काळात सुरू झाले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या योजनेच्या उद्धाटनासाठी वेळ मागितली असून, लवकरच नेर तलावात पाणी पडणार आहे. केंद्र सरकार राजकारण आणून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देणाऱ्या कारखानदारांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बैलगाडी शर्यती कर्नाटक आणि तमिळनाडूच्या धर्तीवर सुरू करण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात प्रयत्न करू.’’

शशिकांत शिंदे म्हणाले,‘‘ जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रदीप विधाते यांनी सर्वसामान्य लोकांच्या व्यथा जाणून तळागाळापर्यंत काम केले आहे. त्यांनी अक्षरशः विकासकामांचा झंझावात केला आहे. जबाबदारी म्हणून खटावच्या जनतेनेही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.

जिहे-कठापूर योजनेचे पाणी खटावमधील मोळ, मांजरवाडीसह डोंगरमाथ्यावरील सर्व गावांना प्राधान्याने देण्यासाठी प्रयत्न करावेत.’’

हेही वाचा: सातारा : जिल्‍हा बँकेचा निर्णय स्थानिक नेत्यांकडे : अजित पवार

पालकमंत्री पाटील म्हणाले,‘‘ कोरोनाच्या संकट काळात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून केलेली रुग्णसेवा नक्कीच प्रशंसनीय आहे.’’

श्रीनिवास पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, जिल्हा वीज वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी बाळासाहेब जाधव तर जिल्हा नियोजन सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सागर साळुंखे आणि सतीश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. चिमणगाव येथील भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदीप विधाते यांनी प्रास्ताविक केले. अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सागर साळुंखे यांनी आभार मानले.

दरम्यान, प्रदीप विधाते यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या खटाव येथील साडेदहा कोटी रुपयांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा वैद्यकीय अधिकारी राधाकिशन पवार, खटाव तालुका वैद्यकीय अधिकारी युनूस शेख व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

काम करणाऱ्यांना संधी

आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये तळागाळात काम करणाऱ्या आणि समाज पाठीशी असणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस संधी देईल, असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top