महावितरणचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

वजरोशी (ता. पाटण) येथील मालन डफळे या शेतकरी महिलेच्या मृत्यूने महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ठेकेदाराच्या सदोष कामाचा तर अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा फटका सर्वसामान्य कुटुंबाला बसल्याचे समोर येत आहे. भलेही यातील दोषींवर कारवाई होईल मात्र एक निष्पाप जीवाचा हकनाक बळी महावितरणच्या उदासीन कारभारामुळे गेला त्याचे काय? याप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. 

तारळे (जि. सातारा) : वजरोशी दुर्घटनेतून अनेक प्रश्नांना जन्म दिला असून याची उत्तरे कधी आणि कशी मिळणार? अशी चर्चा विभागात सुरू आहे. बंद डिपी मध्ये वीजप्रवाह उतरलाच कसा? डीपी उभारताना क्रॉस लाईन कोणाच्या परवानगीने टाकली गेली? टाकलेल्या क्रॉस लाईनमधील दोन लाईनमध्ये सुरक्षित अंतर न ठेवता डिपीची जोडणी कशी केली? इतरवेळी सर्वसामान्य जनतेला क्रॉस जोडणी नाकारणारे अधिकारी या जोडणी वेळी ठेकेदारावर कशामुळे मेहेरबान झाले? काही महिन्यांपूर्वी उभारलेले खांब लगेच कसे वाकले? त्यासाठी नियमाप्रमाणे खड्डयांची खोली व रुंदी घेतली होती का? ते नियमाप्रमाणे भरले होते का? दोन खांबांमधील अंतर योग्य होते का? अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले का? केले नसेल तर एवढा मोठा दोष त्यांना का दिसला नाही. जागेवर न जाता कार्यालयात बसून काम पूर्ततेचे अहवाल दिले जातात का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

विभागात एक शेतकरी एक डीपी योजनेतून असंख्य डीपी उभ्या राहिल्या आहेत. त्यात किती डिपींचे नियमाप्रमाणे काम झाले आहे. त्यातील कामेही सदोष असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी सर्व नव्या कामांची तपासणी करण्याची गरज आहे. या घटनेमुळे शेतकरी संतप्त झाला असुन दोषींवर कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशाराही विभागातील शेतकऱ्यांनी दिला आहे. 

विभागात अनेक खांब वाकलेल्या स्थितीत आहेत. तारा लोंबकळत आहेत. अनेक डीपींचे फ्यूज बॉक्‍स उघडले आहेत. अनेक खांब सडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. शिवाय ठेकेदारांची सदोष कामे त्यात भर घालत आहेत. त्यामुळे शिवारात घोंगावतोय मृत्यू असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

अहवाल महत्त्वाचा 
महावितरणकडून लाईन इन्स्पेक्‍टरने घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली आहे. त्यांचा अहवाल सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. या अहवालावर अधिकारी व ठेकेदारांचे भवितव्य अवलंबून आहे. या अहवालात नेमके काय असणार याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत. मात्र एकूणच तारळे विभागातील महावितरणच्या कामाचा संपुर्ण आढावा घेऊन भयभीत शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याची मागणी होत आहे. 
 

या प्रश्नावर अजित पवार म्‍हणाले, सातारकरांबद्दल आम्‍हाला अभिमानच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Anger Among The People About The Work Of MSEDCL