esakal | 'या' प्रश्नावर अजित पवार म्‍हणाले, सातारकरांबद्दल आम्‍हाला अभिमानच...
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार

भविष्यातील 50 वर्षे डोळ्यासमोर ठेऊन साताऱ्यातील शासकीय मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण केले जाईल, तसेच येत्या मंगळवारपर्यंत जिल्हा रुग्णालयात कोविड 19 चाचणी सेंटर सुरू करण्याबाबतच्या सूचना आरोग्य सचिवांना दिल्या आहेत, असे सांगतानाच माझ्‍या पुण्‍यापेक्षा सातारकरांनी पवारांवर खूप प्रेम केले आहे. त्‍यामुळे सातारकरांबद्दल आम्‍हाला कायमच अभिमान वाटतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

'या' प्रश्नावर अजित पवार म्‍हणाले, सातारकरांबद्दल आम्‍हाला अभिमानच...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : छत्रपती शिवाजी संग्रहालय, (कै.) यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय हॉल अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना आगामी काळात गती दिली जाईल. विविध उद्योगांना महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकाऱ्यांनी "व्हीजन 2030' साठी पेपर तयार केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कोरोना संसर्ग उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. या वेळी सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय थोरवे प्रमुख उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""कोरोना उपाययोजना करताना सरकारकडून कुठलीही कमतरता भासणार नाही. जिल्हा रुग्णालयात कोविड 19 चाचणी सेंटर मंगळवारपर्यंत सुरू करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या सचिवांना केल्या आहेत. छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाच्या रखडलेल्या बांधकामाबाबत पालकमंत्री पाठपुरावा करणार आहेत, तर (कै.) यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहाच्या कामासाठी आठ ते नऊ कोटींची गरज असून, त्याची बजेटमध्ये तरतूद केली आहे. तीनपैकी एक प्लॅन अंतिम करून काम सुरू होईल. बा. सी. मर्ढेकर स्मारकाचेही काम मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.'' 

साताऱ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत खंत व्यक्त करून श्री. पवार म्हणाले, ""बारामतीच्या आधी साताऱ्याचे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. मात्र, आजअखेर जागेचा प्रश्न सुटलेला नाही. गेल्या पाच वर्षांत बारामती कॉलेजचे काम पूर्ण होऊन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. साताऱ्याचे मेडिकल कॉलेज राहिले हे बरोबर नाही. तीन प्रस्ताव प्रशासनाने सादर केले. मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाची जागा देण्यात येणार आहे. बारामती कॉलेज 25-30 एकरांवर आहे. साताऱ्याचे कॉलेज 70 एकर जागेवर बांधण्यात येणार आहे. शासकीय विश्रामगृह, जिल्हा नियोजन समितीच्या हॉलसाठी जिल्हाधिकारी जागा देणार आहेत, तसेच सातारा, महाबळेश्‍वरमध्ये सिमेंट कॉंक्रिटचे पक्के हेलिपॅड बांधण्याच्या सूचना केल्या आहेत. मेडिकल कॉलेजसंदर्भात गुरुवारी सकाळी दहा वाजता संबंधित विभागांची बैठक बोलावण्यात आली आहे.'' 

कोरोनानंतर महाराष्ट्र कसा असेल, व्हीजन आणि दिशा काय असेल, असे विचारले असता श्री. पवार म्हणाले, ""व्हीजन 2030 साठीचा पेपर तयार आहे. आताच त्याचा उलगडा करणार नाही. मुख्यमंत्री व सर्व सहकारी प्रयत्नशील आहेत. त्याबाबत संबंधित तज्ज्ञांशी बोलणे सुरू आहे. कुठल्या इंडस्ट्रीला वेलकम केले पाहिजे, लाल कारपेट टाकले पाहिजे याचा विचार सुरू आहे. बाहेरील मोठे उद्योग चीन सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. उद्योगांसंबंधी धोरण आखले आहे. मागील पाच वर्षांत पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांवर अन्याय झाला.'' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना राज्यातील कुठल्याही विभागावर अन्याय होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शासकीय कार्यालयातील इमारतींची स्वच्छतेबाबत निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी या वेळी सविस्तरपणे सांगितले. 

साताऱ्याबद्दल अभिमान 
शिवेंद्रसिंहराजे शरीराने भाजपमध्ये आणि मनाने राष्ट्रवादीत आहेत, अशी त्यांची देहबोली असल्याबाबतच्या प्रश्‍नावर अजित पवार म्हणाले, ""कुठल्याही पक्षाची कुठलीही व्यक्ती प्रश्न घेऊन येऊ शकते. शिवेंद्रसिंहराजे हे लाखो लोकांचे प्रतिनिधी आहेत. मी पालकमंत्री असताना शंभूराज देसाई आमदार होते. त्या वेळी मी भेदभाव केला नाही. (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर या जिल्ह्याने शरद पवारांवर प्रेम केले. अतिशय मान दिल्याने साताऱ्याबद्दल अभिमान आहे. माझ्या पुणे जिल्ह्यापेक्षा सातारा जिल्ह्याने पवारांवर व राष्ट्रवादीवर प्रेम केले आहे.'' आमचे काम आम्ही करत राहणार. ज्यांनी त्यांनी काय करावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. 
 

loading image