सातारा : येरळवाडी तलावात फ्लेमिंगोंचे आगमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा : येरळवाडी तलावात फ्लेमिंगोंचे आगमन

सातारा : येरळवाडी तलावात फ्लेमिंगोंचे आगमन

सातारा (कलेढोण) : वाढत्या गुलाबी थंडीबरोबर परदेशी पाहुणे येरळवाडी (ता. खटाव) येथे सुमारे ४० ते ४५ फ्लेमिंगोंचे (रोहित) आगमन झाले आहे. थंडीत दाखल झालेल्या परदेशी पाहुण्यांमुळे पक्षीमित्र आनंदले आहेत. येथील तलावात बार हेडेड गुज, गोल्डन डक यासह स्थानिक पक्ष्यांचाही किलबिलाट वाढला आहे.

खटाव तालुक्यात येरळवाडी, मायणी, कानकात्रे व सूर्याचीवाडी तलाव हे रोहित पक्ष्यांचे थवे थंडीत वास्तव्यास येतात. त्यातील सूर्याचीवाडीत यावर्षी पाणीसाठा न झाल्याने येरळवाडीत फ्लेमिंगोंनी हजेरी लावली आहे. पेरू, चिली, मंगोलिया, बोलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अँडीज रांगांत, तर भारतात कच्छच्या रणात फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात आढळतात. या भागात पडणाऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हे पक्षी दुष्काळी तालुक्यातील मायणी, येरळवाडी व कानकात्रे येथे हजेरी लावतात. त्यांचे निरीक्षण करण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, कऱ्हाड आदी ठिकाणांसह स्थानिक भागातून पक्षीमित्र तलावावर दाखल होतात. सध्या वडूजपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या येरळवाडी तलावात सुमारे ४० ते ४५ फ्लेमिंगो दाखल झाले आहेत. दर वर्षी हे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये हे पक्षी खटाव, माणच्या तलावावर दाखल होतात.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

या फ्लेमिंगोंची उंची सुमारे चार ते पाच फूट असते. गुलाबी पाय, बाकदार इंग्रजीतील ‘एस’ आकारासारखी मान, वरून पांढरा रंग व आतून गुलाबी पंखाचा रंग असणारे फ्लेमिंगो जेव्हा हवेत झेप घेतात, तेव्हा ते अग्निज्वाळा हवेत जात आहेत, असे दृश्‍य पाहण्यासाठी पक्षीप्रेमी उत्सुक असतात. सकाळ व सायंकाळ वेळेस तलावाच्या उत्तर बाजूस हे पक्षी दिसत आहेत. सध्या तलावात नदीसुरय, गोल्डन डक, बार हेडेड गुज, स्पून बिल, चक्रांग बदक, कांडेसर, चित्रबलाक, कवड्या खंड्या, चांदवा, पांढरा- पिवळा परीट, पाणकावळा, पाणबुडी, शराटी, शेकाट्या, खंड्या, कवड्या, तुतारी, तिमळी, पाणपाकोळी, पाणकाड्या बगळा, राखी बगळा आदी पक्षी दाखल झाले आहेत.

लेसर फ्लेमिंगोही दाखल...

लेसर फ्लेमिंगो हा फ्लेमिंगोपेक्षा लहान असतो. चोच काळी, पंखाखालची पिसे काळसर व गुलाबी असतात. उड्डाणस्थितीत असताना अंगालगत मागे वळलेले आखूड पाय ही या पक्ष्याच्या ओळखीची खूण आहे. हे मोठ्या रोहित पक्ष्यांसोबत वास्तव्य करतात.

"गेल्या चार दिवसांपासून फ्लेमिंगोचा थवा दिसत आहे. त्यांच्या आगमनामुळे येरळवाडीत पर्यटक दाखल होत आहेत."

- किसन शिंदे, येरळवाडी

loading image
go to top