काळजी घ्याच... तुमच्या मुलाचाही जाऊ शकतो जीव

 काळजी घ्याच... तुमच्या मुलाचाही जाऊ शकतो जीव
Updated on

सातारा : फेसबुकवरील ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका युवकाने आत्महत्या केल्याचा, तसेच याप्रकरणी त्याच्याच वयोगटातील व त्याच्याच महाविद्यालयातील दुसऱ्या एका युवकावर गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार काल समोर आला. त्यामुळे युवक- युवतींनी समाज माध्यमे वापरताना घ्यावयाच्या काळजीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारामुळे दोघांचीही आयुष्य एकप्रकारे उद्‌ध्वस्त होतात हे नव्या पिढीने समजून घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी मुले करतात काय? यावर लक्ष व कोणत्याही बाबतीत मुले संवाद साधू शकतील, असे वातावरण निर्माण करण्याची पालकांची जबाबदारी वाढली आहे. 

व्यंकटपुरा पेठेतील प्रथमेश नावाच्या मुलाने फेब्रुवारी महिन्यामध्ये राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडल्यानंतर फसवणुकीबाबत कुठे तक्रार करायची असते, असे मुलाने काही दिवसांपूर्वी विचारलेले शब्द वडिलांच्या कानावर आले. त्यांनी तातडीने मुलाचा मोबाईल तपासला. तो बंद होता. सीमकार्डचा उपयोग करून त्यांनी त्याचे फेसबुक अकाउंट चेक केले. त्यात बनावट अकाउंटवरून त्याच्याशी चॅटिंग झाल्याचे, त्याच अकाउंटवरून अश्‍लील मेसेज आल्याचे, तसेच बहिणीचा मोबाईल क्रमांक पाठव, तिचे फोटो पाठव अशा पद्धतीच्या गोष्टी सुरू असल्याचे समोर आले. त्या चॅटिंगनुसार मुलाने या गोष्टीपासून दूर जाण्यासाठी तशा पद्धतीने मेसेज केल्याचेही समोर आले; परंतु एक गोष्ट त्याच्याकडून झाली नाही ती म्हणजे पालकांशी मनमोकळ्या पद्धतीने संवाद साधण्याची.

कितीही मोठी चूक असली, तरी पालक फारफार ओरडतील, मारतील; परंतु त्या अडचणीतून मुलाला बाहेर काढण्याचा, त्याला आधार देण्याचा प्रयत्नही केवळ ते आणि तेच करू शकतात, याची जाणीव मुलांनी ठेवणे अत्यंत आवश्‍यक आहे. तसा त्या मुलाने पालकांशी संवाद साधला असता, तर नक्कीच चांगली गोष्ट घडली असती. 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळा व महाविद्यालयीन युवकांनी अशा समाज माध्यमापासून दूर राहणे केव्हाही चांगले; परंतु तरीही ते वापर करत असतील, तर ते काय करतात, काय पाहतात, कोणाशी मैत्री करतात यावर पालकांनीही लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. या घटनेमध्ये बनावट अकाउंट तयार करणारा युवकही त्याच्याच महाविद्यालयातील व ओळखीचा युवक आहे. मुलीच्या नावाने अकाउंट तयार करून मित्राला फ्रेंड रिक्वेस्ट त्याने पाठविली. त्यावर चॅटिंग केले. त्यानंतर त्याने मर्यादा ओलांडून बहिणीचा फोटो व क्रमांकाची मागणी करत त्याला त्रास द्यायला सुरुवात केली.

मात्र, हा प्रकार एखाद्याचा जीव घेणारा व स्वतःचेही आयुष्य उद्‌ध्वस्त करणारा ठरेल, याची कदाचित त्यालाही त्या वेळी कल्पना नसले; परंतु आता कायद्याच्या कचाट्यातून वाचता येणार नाही. या घटनेमध्ये अशी अकाउंट तयार करणारा ओळखीचा होता; परंतु अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. मुलांना, तसेच ज्येष्ठांनाही जाळ्यात ओढून लुबाडण्याचे काम त्या करतात. त्यामुळे अशी समाज माध्यमे हाताळताना खरोखरच काळजी घेणे आवश्‍यक आहे. 

युवक-युवतींनी हे करा... 

  • - कोणा अनोळखीला फेसबुक फ्रेंडची रिक्‍वेस्ट पाठवू नका 
  • - अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्‍वेस्ट स्वीकारू नका 
  • - केवळ मित्रांसोबतच चॅटिंग करा 
  • - चॅटिंग करताना मर्यादा ओलांडली जाणार नाही याची काळजी घ्या 
  • - एखादी चूक झाली आणि कोणी ब्लॅकमेल करत असेल, तर पालकांना सांगा 
  • - पालकांशी बोलण्यात संकोच वाटत असेल, तर मित्र किंवा इतर जवळच्या नातेवाईकाशी बोला 
  • - अन्य कोणाशी बोलायचे नसल्यास सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधा 


समाज माध्यमे हाताळताना युवक- युवतींबरोबर सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. त्यातूनही आपल्याकडून काही चूक झाली असेल, असे वाटत असले तरी घाबरून जाऊ नका. प्रत्येक गोष्टीला मार्ग असतात. आयुष्याशिवाय काही अनमोल नाही. फक्त खंबीरपणे कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कोणतीही अडचण असल्यास सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधा. समाज माध्यमांच्या दुनियेत आपण कसे वागले पाहिजे हे समजून घेण्यासाठी "टेक केअर गुड नाईट' हा मराठी चित्रपट आवर्जून सर्वांनी पाहा. 

- गजानन कदम, सहायक पोलिस निरीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com