उदयनराजे... सातारकरांच्या विश्‍वासाला तडा जातोय!

उदयनराजे... सातारकरांच्या विश्‍वासाला तडा जातोय!

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारख्या करारी नेत्याच्या नेतृत्वाखालील सातारा पालिकेतील भ्रष्टाचाराचा भस्मासूर काल समोर आला; परंतु एकंदर गेल्या महिन्यांपासूनच पालिकेतील सर्वच पातळ्यांवरील खाबूगिरीच्या चर्चा झडत आहेत. त्याबाबत तक्रारीही दाखल झाल्या आहेत. ज्या विश्‍वासाने व ज्या गोष्टी नको, यासाठी सातारकरांनी उदयनराजेंच्या हातात पालिकेची सत्ता सोपवली. त्याला हे प्रकार निश्‍चितच भूषणावह नाही. त्यामुळे पालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी व लोकाभिमुख होण्यासाठी उदयनराजेंना गर्जावे लागणार आहे, हे निश्‍चित. 

सातारा पालिकेच्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांची निवडणूक तशी सहजासहजी झाली नाही. दोन स्थानिक आघाड्यांबरोबर भाजप ताकदीने मैदानात उतरला होता. त्यातही वेदांतिकाराजे या नगराध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार म्हणून उभ्या होत्या. अशा परिस्थितीत केवळ आणि केवळ उदयनराजेंच्या नेतृत्वावर,सातारकरांविषयी त्यांचा असलेला जिव्हाळा, त्यांची कार्यपद्धती, खऱ्याला खरे म्हणण्याची धमक या गोष्टींमुळेच सातारकरांनी पालिकेची सत्ता सातारा विकास आघाडीकडे दिली. त्यामुळे मागील काही निवडणुकांतील सत्ताकाळापेक्षा या वेळी उदयनराजेंवर सातारकरांच्या अपेक्षांना जास्त उत्तरदायी राहाणे क्रमप्राप्त होते; परंतु तसे होताना सध्या तरी दिसत नाही. 

उदयनराजेंनी शहराच्या विकासासाठी कामे मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार काही कामे सुरू आहेत; परंतु पालिकेच्या एकंदर प्रशासनाला व पदाधिकाऱ्यांच्या वर्तनाला जी शिस्त अपेक्षित होती. त्याबाबतीत उदयनराजेंनी सातत्याने बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांना चांगले काम करण्याच्या सुचना दिल्या.
परंतु, प्रत्यक्षात अम्मबजावणीच्या पातळीवर नेहमीच शुन्य राहिला आहे. त्यामुळे ते उदयनराजेंचे ऐकतात कि नाही हा खरा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे केवळ सूचना करण्याव्यतिरिक्त उदयनराजेंना याबाबतीत काही करता आलेले नाही. 

मागील दीड वर्ष निवडणुकांमध्येच गेले. त्यातही दोन लोकसभा निवडणुकांमध्ये व त्यानंतर राज्यसभेवर जाईपर्यंत उदयनराजेंचे कक्षात लक्ष घालण्याची तयारी दिसून आली नाही. त्यांच्या त्या राजकीय सक्रियतेच्या अवकाशाचा गैरफायदा पालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी चांगलाच घेतला. नव्हे प्रत्येक कामात खाबूगिरी करण्याची मुजोरी पालिकेतील प्रत्येकात रुजली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादीत असूनही विरोधक आणि भाजपही विरोधक अशी परिस्थिती असताना पालिकेच्या चुकीच्या कारभाराबाबत आवाज उठवला गेला. आंदोलनांच्या भाषा झाल्या. त्यामुळे थोडा का होईना एक प्रकारचा अंकुशहोता; परंतु सर्वच भाजपमयी झाले. त्यामुळे सगळेच चिडीचूप. कोणी विचारायला नाही. त्यामुळे खाबूगिरीची संस्कृती पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच फोफावली गेली. त्याचा परिणाम राज्याच्या वेशीवर साताऱ्याची अब्रू टांगण्यात झाला आहे. 

सातारकरांचा उदयनराजेंवर मनापासून विश्‍वास आहे. त्यांनी शहरातील सर्वच गैरप्रकारांना रोखावे, अशी जनतेची नेहमीच अपेक्षा राहिली आहे; परंतु या वेळी पालिकेच्या बाबतीत त्या अपेक्षांची पूर्तता होताना दिसत नाही. पालिका शहराच्या विकासाचे, की खाबूगिरीचे केंद्र हे ठरविण्याची आता वेळ आली आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या शुद्धीकरणाचीच गरज आहे. प्रश्‍न आहे तो उदयनराजे त्यासाठी सक्रिय होणार का याचा. 

कायम सक्रिय राहण्याची जरूरी 

उदयनराजेंनी केवळ निवडणुकीच्या काळापूरता साताऱ्यात सक्रियपणा घ्यावा हे सातारकरांना अपेक्षित नाही. कारण त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात होणाऱ्या गोष्टींची जबाबदारीही त्या पदाधिकाऱ्यांवर जाणारी नसून ती फक्त आणि फक्त उदयनराजेंवरच येणार आहे. त्यामुळे त्यांना आता ठोस उपाययोजना कराव्या लागतील, हे निश्‍चित. अन्यथा या गोष्टींचा फायदा घेण्याचा प्रयत्न होणार हे निश्‍चित आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com