
एकतर रस्त्यांवरील खड्डे हे महाराष्ट्राच्या प्रगतीला लागलेले ग्रहण... ते कधी सुटणार असा प्रश्न सर्वांसमोर असतोच. पण, कधी कधी काही कामसू अधिकारी आणि ठेकेदार आपल्यामागचे ग्रहण लवकर सुटावे, यासाठी कशाचीही तमा न बाळगता जेव्हा काम उरकतात तेव्हा मात्र जनतेच्या मागे ग्रहण लागते. तसाच प्रकार एका ठेकेदाराच्या प्रतापामुळे पुढे आला आणि सर्वांनीच भर पावसात चाललेल्या रस्ता डांबरीकरणाच्या कामाबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
अहो आश्चर्यम्..! भर पावसात रंगला खेळ डांबरीकरणाचा..!
अंगापूर, (जि. सातारा) : सातारा तालुक्यातील देशमुखनगर ते कामेरी रस्त्यावर भर पावसात सुरू असलेले रस्ता नूतनीकरणाचे काम पाहून ग्रामस्थ व या रस्त्यावरून दररोज ये जा करणारे प्रवासी अचंबीत झाले.
शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व भर पावसात सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा काय व या रस्त्याचे भवितव्य काय? असा प्रश्न येथील ग्रामस्थांना व वाहन चालकांना पडला असून या कामाचे गौडबंगाल काय? तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी हे काम करणाऱ्या ठेकेदारावर एवढे मेहरबान कसे? अशी शंका उपस्थित करत ग्रामस्थांनी ते काम बंद पाडले.
गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर खडीकरण व डांबरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लॉकडाउन नंतर पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्याच्या कामाला सुरवात झाली असून याच रस्त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे पावसात काम चालू होते. त्यावेळी फत्यापूर, कामेरी येथील लोकप्रतिनिधी तसेच जागरूक नागरिकांनी पावसातील कामास विरोध केला होता. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना त्रासलेल्या व वैतागलेल्या ग्रामस्थांनी चालू कामास विरोध नको म्हणून नरमाईची भुमिका घेतली होती. ग्रामस्थांच्या माहितीनुसार तसे पाहता शासकीय नियमानुसार पंचवीस मे नंतर डांबरीकरणाची कामेच थांबवली जातात. परंतु ह्या रस्त्याचे काम हे पावसाळ्याच्या तोंडावर नव्हे तर भर पावसात युद्धपातळीवर सुरू आहे.
वाहनचालकांच्या सोयीसाठी चांगला रस्ता महत्वाचा असल्याने लोक सहकार्य करत असले, तरी गेली काही दिवसांपासून भर पावसात निकृष्ट दर्जाच्या डांबराने ओल्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरू असल्याने त्याचा दर्जा काय व तो किती दिवस टिकणार हा प्रश्न ग्रामस्थ व या रस्त्यावर दैनंदीन वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या मनात घर करून आहे.
खरंच... पुरुष वाईट असतात का..?
Web Title: Satara Asphalting Roads Heavy Rains
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..