Satara: ‘हात से हात जोडो’ अभियान यशस्वी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस

Satara: ‘हात से हात जोडो’ अभियान यशस्वी करा

निमसोड : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून दिलेला संदेश गावागावांतील शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी काँग्रेस पक्षाने ‘हात से हात जोडो’ अभियान सुरू केले आहे. हे अभियान माण व खटाव तालुक्यांतील सर्व गावांमध्ये पोचविण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम तयार केला असून, कार्यकर्त्यांनी तो यशस्वी करावा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे सचिव रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे.

अभियानाच्या नियोजनासाठी माण व खटाव ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेंद्र शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिली होती. त्या वेळी देशमुख बोलत होते. या वेळी प्रदेश प्रतिनिधी राजूभाई मुलाणी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सत्यवान कांबळे व माण, खटाव तालुक्यांतील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरली असून, देशातील जनतेला भेडसावणाऱ्या अनेक ज्वलंत प्रश्नांना या पदयात्रेने ऐरणीवर आणले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशात महागाई व बेरोजगारी वाढली असून, याविरोधात संघर्षासाठी आणि देशातील जनतेमध्ये प्रेम, विश्वास व बंधुभाव निर्माण करण्यासाठी युवकांनी सज्ज व्हावे, हा राहुल गांधींचा संदेश हात से हात जोडो अभियानाच्या माध्यमातून वाडीवस्तीवरील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचविण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.’’

राजेंद्र शेलार म्हणाले, ‘‘एक फेब्रुवारी ते ३० मार्च या कालावधीत हात से हात जोडो अभियान प्रत्येक गावात राबविण्यात येणार असून, माण व खटाव तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते हा संकल्प निर्धारपूर्वक यशस्वी करतील.’’

खटाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, माण तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरजित कांबळे, शिवाजीराव यादव, ॲड. पी. डी. सावंत, राजेंद्र माने, रवींद्र शिंदे, संदीप चव्हाण, राहुल सजगने आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.