esakal | सातारा भूषण पुरस्कारामुळे प्रेरणा, प्रोत्साहन : चारुदत्त आफळे : Satara Bhushan Award Charudatta Afhale Satara Marathi News
sakal

बोलून बातमी शोधा

Charudatta Afhale

सातारा भूषण पुरस्कारामुळे प्रेरणा, प्रोत्साहन : चारुदत्त आफळे

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : नोकरीची संधी उपलब्ध असूनही बाजूला ठेवत उच्चशिक्षित कीर्तनकारांची पिढी कीर्तन परंपरा पुढे सुरू ठेवत आहे. सातारा भूषण पुरस्काराच्या रूपाने मिळालेली ही शाबासकी मला सतत प्रेरणा, प्रोत्साहन देत राहील, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.

जगातील अनेक देशांतून सांप्रदायिक कीर्तनाची परंपरा जोपासत प्रबोधन करणाऱ्या चारुदत्त आफळे यांना सन 2020 चा रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा सातारा भूषण पुरस्कार समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेशबुवा रामदासी यांच्या हस्ते समर्थ सदनात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. समारंभास ट्रस्टचे विश्वस्त कर सल्लागार अरुण गोडबोले, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, विश्वस्त उदयन गोडबोले, प्रद्युम्न गोडबोले उपस्थित होते.

श्री. आफळे म्हणाले, ""आमचे वडील गोविंदस्वामी आफळे यांनी घालून दिलेला दंडक आमची पिढी पुढे नेत आहे. पुरस्काराच्या रूपातून मिळालेली ही शाबासकी नव्या कार्याच्या पालखीची आणखी एक धुरा असल्याचे मी मानतो. कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून येत्या गुढीपाडव्यापासून पुढील गुढीपाडव्यापर्यंत दर आठवड्याला श्रोत्यांना नामवंत कीर्तनकारांची कीर्तने अनुभवायला मिळणार आहेत. या पुरस्काराने दिलेली जिद्द व उर्मी मी आता समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधवरील निरूपणासाठी दूरदर्शनवरून प्रस्तुत करणार आहे.''

अरुण गोडबोले यांनी रा. ना. गोडबोले सार्वजनिकच्या ट्रस्टची माहिती दिली. कार्यक्रमास समर्थ सेवा मंडळाचे प्रवीण कुलकर्णी, राजू कुलकर्णी, प्रतीक कोठावळे, अनुपमा गोडबोले, अंजली गोडबोले, अनुराधा गोडबोले, प्रियंवदा गोडबोले उपस्थित होत्या.

हेही वाचा - काेराेना लसीकरणात महिला मागेच! कोयनानगर परिसरातील वास्तव; भीतीमुळे उदासीनता, जनजागृतीची गरज