प्रश्न साेडविण्यासाठी भाजपच्या 'या' खासदाराची प्रसंगी कायदा हातात घेण्याची तयारी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

पोल्ट्री व्यवसायाने सर्वत्र माशा आहेत. या स्थितीत लहान मुलांच्या नाका तोंडात माशा जात आहेत. आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. या वस्तीवरील कोणत्याही घरात आपण अथवा पोल्ट्रीचा मालक त्यांच्या बायकापोरांसह माशांच्या थारोळ्यात जेवण कराल का? असा सवाल निंबाळकर यांनी उपस्थित डॉक्‍टर प्रतिनिधीस केला असता त्यांनी मान खाली घालत नकार दिला.

फलटण शहर (जि.सातारा) : हिंगणगाव येथील नागरिकांच्या आरोग्यप्रश्नी खासदार रणजितसिंह निंबाळकर आक्रमक झाले आहेत. येत्या 24 तासांत येथील पक्षी हलवून सर्व पोल्ट्री स्वच्छ करा. ऐकणार नसाल तर कायदा हातात घ्यायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यामध्ये हस्तक्षेप करून पोल्ट्री बंदची सूचना द्यावी, अशीही मागणी निंबाळकर यांनी केली.
 
हिंगणगाव येथील सूळवस्ती येथे पोल्ट्रीमध्ये सुमारे 50 हजार पक्षी असून, यामुळे मोठ्या प्रमाणात माशा झाल्या आहेत. तेथील नागरिकांना गेली अनेक वर्षे संसर्गजन्य आजारांना व आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याप्रश्नी पोल्ट्री फॉर्मनजीक येथील ग्रामस्थ व महिलांनी बेमुदत उपोषण आंदोलन केले. तेथे भेट देत संबंधित पोल्ट्री चालकांच्या प्रतिनिधींशी बोलताना खासदार निंबाळकर यांनी इशारा दिला. या वेळी प्रांताधिकारी शिवाजी जगताप, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्यासह हिंगणगाव व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
 
माशांमुळे संसर्गजन्य रोग फैलावण्याचा धोका आहे. गावाला त्रास होईल, असे वर्तन पोल्ट्री चालकाकडून होत आहे. दबावतंत्राचा वापर आता चालणार नाही. लोकांना त्रास सुरूच राहिला, तर मात्र परिणाम गंभीर होतील, असे स्पष्ट करून निंबाळकर म्हणाले, ""कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणूनच आज आपण येथे आलो आहोत. तुमच्या व्यवसायास आमची आडकाठी नाही. या व्यवसायातील मोठमोठ्या पोल्ट्रींमध्ये स्वच्छतेचे कशाप्रकारे व्यवस्थापन केले जाते. या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या, त्याची अंमलबजावणी केल्यानंतरच पोल्ट्री सुरू करा. अन्यथा कायदा हातात घ्यायला व नागरिकांसाठी जेलमध्ये जायला मागेपुढे पाहणार नाही.'' 

अधिकाऱ्याने घातली मान खाली 

पोल्ट्री व्यवसायाने सर्वत्र माशा आहेत. या स्थितीत लहान मुलांच्या नाका तोंडात माशा जात आहेत. आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. या वस्तीवरील कोणत्याही घरात आपण अथवा पोल्ट्रीचा मालक त्यांच्या बायकापोरांसह माशांच्या थारोळ्यात जेवण कराल का? असा सवाल निंबाळकर यांनी उपस्थित डॉक्‍टर प्रतिनिधीस केला असता त्यांनी मान खाली घालत नकार दिला. 

धक्‍कादायक... पाचगणीच्या रुग्णालयातून बाधित युवतीचे पलायन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara BJP MLA Ranjitsingh Naik Nimbalkar Visited Agitation Place In Hingango Near Phaltan