esakal | बारामतीला जाण्याचा मार्ग झाला मोकळा
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीला जाण्याचा मार्ग झाला मोकळा

बाजारपेठ, नोकरी, मजुरी, वैद्यकीय सेवा यानिमित्ताने पूर्व भागातील लोकांचे बारामतीशी अधिक जवळचे संबंध असल्याने गोखळी पूल सुरू होणे गरजेचे होते. अत्यावश्‍यक सेवेसाठी तर हे धोक्‍याचे होते, असे पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांनी नमूद केले.

बारामतीला जाण्याचा मार्ग झाला मोकळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आसू (जि.सातारा) : बारामती आणि फलटण तालुक्‍याला जोडणारा नीरा नदीवरील गोखळी पूल गेल्या दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज सुरू झाला. त्यामुळे पूर्व भागातील 15 गावांच्या नागरिकांचा बारामतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

प्रशासनाने जिल्हा बंदीचे आदेश लागू केल्यानंतर फलटण पूर्व भागातील नीरा नदीवरील गोखळी पूल वाहतुकीस बंद करण्यात आला होता. त्यामुळे पूर्व भागातील आसू, पवारवाडी, गोखळी, खटकेवस्ती, हणमंतवाडी, शिंदेनगर, मुंजवडी, बरड, गुणवरे आदी गावांतील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. परिणामी बारामतीच्या बाजारपेठेचा संपर्क तुटला, तसेच अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा घेण्याबरोबरच नोकरदार, मजूर यांच्यासह परस्पर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनाही अनेक अडचणी येत होत्या. अशा स्थितीत गोखळीच्या सरपंच सुमनताई गावडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज गावडे, खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे, पवारवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर पवार आणि आसूचे सरपंच महादेव सकुंडे यांनी गोखळी पूल बंद असल्याने पूर्व भागातील नागरिकांना बारामतीकडे जाण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांच्याकडे मांडल्या. त्यांनी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याशी संपर्क साधून गोखळी पूल खुला करण्यासंदर्भात चर्चा केली. नीरा नदीवरील या पुलावरून वाहतूक सुरू करण्याबाबत श्री. खर्डेकर यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, पोलिस उपअधीक्षक तानाजीराव बरडे यांनी भेट देऊन परिसरातील ग्रामस्थांशी चर्चा केली.
 
यानंतर शिवरूपराजे यांनी पूर्व भागातील शेतकरी आणि सर्वसामान्यांचा बारामतीशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे किमान पूर्व भागासाठी तरी या पुलावरील वाहतूक तत्काळ सुरू करावी, अशी मागणी पुन्हा प्रांताधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान, पुलाच्या गोखळीकडील बाजूचा मार्ग पाच दिवसांपूर्वीच मोकळा करण्यात आला होता. मात्र, मेखळीकडील बाजू बंद होती.
 
बाधितांची संख्या वाढल्यामुळे बारामतीचे सर्व व्यवहार काही काळांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यादरम्यान गोखळीकरांनी पुलावरील वाहतूक बंद करून मेखळीकरांसाठी गोखळीसह फलटणची बाजारपेठ बंद केली होती. त्या पार्श्वभूमीवर मेखळीकरांनी गेले पाच दिवस अडवणूक केली असताना प्रांताधिकारी जगताप यांनी मेखळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी बोलून तोही मार्ग मोकळा केला. गोखळी पूल पूर्ववत सुरू झाल्याने फलटण पूर्व भागातील सुमारे 15 गावांचा बारामतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गोखळी, मेखळीसह परिसरातील नागरिकांनी प्रशासन आणि पदाधिकारी यांना धन्यवाद दिले. 

बाजारपेठ, नोकरी, मजुरी, वैद्यकीय सेवा यानिमित्ताने पूर्व भागातील लोकांचे बारामतीशी अधिक जवळचे संबंध असल्याने गोखळी पूल सुरू होणे गरजेचे होते. अत्यावश्‍यक सेवेसाठी तर हे धोक्‍याचे होते, असे पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांनी सांगितले.

कऱ्हाड : गणेशोत्सव यंदा साधेपणाने; कोरोना संसर्गाची भीती 

वडूज पाेलिस सतर्क; एक दाेन नव्हे तब्बल 66 जणांवर कारवाई

काेणी घेतलाय पुढाकार. कशी मिटणार चिंता. त्यासाठी काय झाले पाहिजे वाचा