पावसा पावसा थांब रे, पाझरू लागली शिवारे...शेतकरी वर्गातून साद

संजय जगताप 
Wednesday, 16 September 2020

सखल भागातील शेतांमध्ये वारंवारच्या पावसाने दलदल निर्माण झाली आहे. तेथे ये-जा करता येत नसल्याने कुजून जाऊ लागलेली पिके काढता येईनात. डोळ्यादेखत होणारे शेतीचे नुकसान पाहून शेतकऱ्यांचा जीव तीळतीळ तुटत आहे.

मायणी (जि. सातारा) : पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरातील सर्व बांध, बंधारे, तलाव भरून वाहू लागले आहेत. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीराजा पावसा पावसा थांब रे... अशी साद वरुणराजाला घालू लागला आहे. 

यंदा पूर्वमोसमी व मोसमी पावसाने या भागात जोरदार हजेरी लावली. आता परतीचा पाऊसही चांगली "बॅटिंग' करीत आहे. त्यामुळे मायणी तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील कानकात्रे, ढोकळवाडी, पडळ, हिवरवाडी, विखळे, कलेढोण, पाचवड, मुळीकवाडी व गारळेवाडी आदी गावोगावचे पाझर तलाव, बांध, बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत.

लोकसहभागातून गावोगावी केलेले जलसंधारणाचे बांध भरले आहेत. त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. शिवारात ठिकठिकाणी पाझर फुटले आहेत. झरे निर्माण झाले आहेत. सखल भागातील शेतांमध्ये पाणी साचून राहिले आहे. त्या पाण्यामध्ये उडीद, मूग, सोयाबीन, चवळी अशी विविध पिके बुडाली आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजरीची पिके भुईसपाट झाली आहेत. 

काही भागात उसाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. पावसाची दीर्घकाळ उघडीप मिळत नसल्याने व ढगाळ वातावरणामुळे शेतात साचलेले पाणी जैसे थे राहत आहे. परिणामी पाण्यातील पिके कुजून जाऊ लागली आहेत. सखल भागातील शेतांमध्ये वारंवारच्या पावसाने दलदल निर्माण झाली आहे. तेथे ये-जा करता येत नसल्याने कुजून जाऊ लागलेली पिके काढता येईनात. डोळ्यादेखत होणारे शेतीचे नुकसान पाहून शेतकऱ्यांचा जीव तीळतीळ तुटत आहे.

मात्र, पर्याय नसल्याने शेतकरी पावसाच्या दीर्घकाळ उघडिपीची वाट पाहत आहेत. शेतात साचलेल्या पाण्यामुळे आगामी रब्बी हंगामाची पेरणीपूर्व मशागतीची कामेही लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्याचबरोबर यंदा सर्वत्र पुरेसा पाणीसाठा झाला असल्याने रब्बी हंगामात चांगले उत्पन्न मिळण्याची खात्री शेतकऱ्यांना वाटत आहे. 

""शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. बाजरी व ऊस खाली पडला आहे. त्याचे पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी.'' 
-राजकुमार चव्हाण, शेतकरी, गोरेगाव, ता. खटाव 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Calling For An End To The Rains The Farmers Started Increasing Their Crop Losses