esakal | सातारा : झेडपीच्या कर्मचाऱ्यांना सीईओंकडून नोटिसा
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

सातारा : झेडपीच्या कर्मचाऱ्यांना सीईओंकडून नोटिसा

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत कर्मचारी व नागरिक मास्क न घालताच फिरत असल्याचे चित्र सातत्याने दिसून येत आहे. मागील चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना मास्क न घालताच कर्मचारी भेटावयास आले होते. या प्रसंगी सीईओंनी कडक भूमिका घेत संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत.

जिल्हा परिषद, विविध पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेशी संबंधित कार्यालयांतील आतापर्यंत २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तसेच हजारांहून अधिक बाधित झाले होते. बाधित आता कोरोनामुक्त झाले तरी काळजी म्हणून जिल्हा परिषद आता सतर्क झाली आहे. त्यामुळे जर मास्क नसेल तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्यामुळे काहींनी कोरोना प्रादुर्भाव संपला असे वाटत आहे. त्यातच आता तिसऱ्या लाटेचीही भीती असल्यामुळे काळजी घेणे बंधनकारक बनले आहे.

हेही वाचा: कोल्हापूर - रविवारी कॅन्डल मार्च तर सोमवारी जिल्हा बंद

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या काही विभागांतील अनेक कर्मचारी मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत अडीच लाख बाधित आढळून आले असून अजूनही आठ ते नऊ हजार बाधित जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मागील काही दिवसांपासून मृत्यूचा दर कमी झाला तरी गेल्या दीड वर्षातील मृत्यूचा आकडा ६ हजार ३५२ एवढा आहे.

‘‘कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपला नसून प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी जिल्हा परिषदेतील कर्मचारी व नागरिकांनी मास्क घालणे बंधनकारक आहे. कोरोनाचे नियम मोडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.’’

- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

loading image
go to top