सातारा : एकनाथ शिंदेंच्‍या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Devendra Fadanvis

सातारा : एकनाथ शिंदेंच्‍या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी?

सातारा : महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर आता भाजप आणि शिंदे गट सत्ता स्थापन करणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे या नव्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातून भाजपकडून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, तर शिवसेनेकडून शंभूराज देसाई मंत्रिपदाचे दावेदार ठरले आहेत. त्यातही पालकमंत्री पदासाठी भाजप, सेनेकडून दावा केला जाणार असल्याने पालकमंत्रिपद नेमके कोणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीवेळी शिवेंद्रसिंहराजे व जयकुमार गोरेंना कॅबिनेट मंत्रिपदाचा दिलेला शब्द देवेंद्र फडणवीस पाळणार का? याकडे या नेत्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक नाट्यपूर्ण घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाले. त्यामुळे भाजप, एकनाथ शिंदे गट तसेच मनसे एकत्र येत सत्ता स्थापन करणार आहे.

या नव्या सरकारमध्ये सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळणार, हे निश्चित झाले आहे. त्यांच्यासोबत बंडात सहभागी माजी मंत्री शंभूराज देसाई व महेश शिंदे यांच्याही पदरात काही पडेल, अशी आशा आहे. शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. त्यासोबतच त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही हवे आहे; पण भाजपकडून पालकमंत्रिपदासाठी दावा केला जाऊ शकतो. सध्या तरी सोशल मीडियावर महेश शिंदेंना कृष्णा खोरे विकास महामंडळ मिळणार असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामुळे महेश शिंदेंच्या पदरात काय पडणार? याकडे कोरेगावकरांचे लक्ष आहे.

भाजपचे जिल्ह्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्यापैकी कोणाला मंत्रिपद मिळणार? हेही तितकेच महत्त्वाचे आहे. दोघेही देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत.

राष्ट्रवादीने गेल्या तीन पंचावार्षिक आमदार शिवेंद्रसिंहराजेंना मंत्रिपद दिले नव्हते. त्याला जुनीच कारणे आहेत. याची सल त्यांच्या मनात होती. मागील विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे यांना देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्रिपद व पालकमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यानुसार त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

चौथ्यांदा ते सातारा- जावळीचे आमदार झाले; पण राज्यात भाजपची सत्ता येऊ शकली नाही. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यात पुन्हा भाजप, एकनाथ शिंदे गट व मनसे याची सत्ता येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वंशज म्हणून भाजपकडून आमदार शिवेंद्रसिंहराजेंना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची संकेत मिळत आहे. त्यानुसार त्यांना सहकारमंत्री व पालकमंत्रिपदही दिले जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनाही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी झालेल्या सभेत मंत्रिपद देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देऊन फडणवीस शब्द पाळणार का? याची उत्सुकता आहे. सध्या तरी सातारा, पाटण, कोरेगाव व माण तालुक्यांतील आमदार समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे.

शिवेंद्रसिंहराजेंना भाजप संधी देणार?

साताऱ्याच्‍या भोसले घराण्याने राज्याच्या राजकारणावर चांगला ठसा उमटविला आहे. माजी मंत्री (कै.) अभयसिंहराजे भोसले हे काँग्रेसच्या काळात महत्त्वाच्या मंत्रिपदावर होते. मात्र, त्यांना नंतर राष्ट्रवादीने मंत्रिपदापासून दूर ठेवले होते. त्यांच्या निधनानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाही राष्ट्रवादीने मंत्रिपद दिले नाही. आता त्यांचे चार मतदारसंघांत वर्चस्व आहे आणि भाजपला त्यांनी साथ दिली आहे. याचा विचार करून त्यांना या वेळी मंत्रिपद दिले जाईल, अशी जिल्ह्यात चर्चा सुरू आहे, तर शंभूराज देसाई यांनी मंत्रिपद असतानाही बंडखोरांना साथ दिली. त्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

Web Title: Satara Character Eknath Shinde Cabinet Shambhuraj Desai Shivendrasinharaje Bhosale

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraBjpEknath Shinde