esakal | शहर मोठे; पण रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ता!
sakal

बोलून बातमी शोधा

man

दहिवडी शहरातील मायणी चौक ते खांडसरी चौक दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. कित्येक ठिकाणी डांबराचा लवलेशही शिल्लक नाही. येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न पडतो. 

शहर मोठे; पण रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ता!

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : अनेक महत्त्वाची कार्यालये असलेल्या येथील मायणी चौक ते खांडसरी चौका या दरम्यानच्या रस्त्याची अतिशय भयावह अवस्था झाली आहे. येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न पडला आहे. 

दहिवडी बस स्थानकावरून गोंदवले बुद्रुककडे जाणाऱ्या रस्त्यावर मायणी चौक आहे. या चौकातून खांडसरी चौक ते पुढे कातरखटाव, मायणी, विटा या गावांकडे जाणारा मुख्य रस्ता जातो. हाच रस्ता भिगवन-सांगली राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. या रस्त्यालगत विविध शासकीय कार्यालये आहेत. न्यायाधीशांचे निवासस्थानही आहे. या कार्यालयांमध्ये नेहमीच अनेक नागरिकांचा संपर्क येतो. त्यामुळे स्थानिक, तसेच कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांची वर्दळ असते. मालवाहतूक करणाऱ्या अवघड वाहनांचीही वर्दळ सुरू असते. 

या रस्त्यावर मायणी चौक ते खांडसरी चौक दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. कित्येक ठिकाणी डांबराचा लवलेशही शिल्लक नाही. प्रांताधिकारी कार्यालयालगतच भले मोठे खड्डे पडलेत. एका ठिकाणी मोठी चर काढली असून, ती बुजविण्यात आलेली नाही. एक- एक खड्डा एक फुटापासून तीन ते चार फूट व्यासाचा, तर एक फूट ते तीन फूट खोलीचा आहे. छोट्या- छोट्या खड्ड्यांची गणतीच नाही. 
या खड्ड्यांमुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहेत. संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून खड्डे बुजवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. 


या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालविणे प्रवाशांना जिकिरीचे झाले आहे. रस्ता दुरुस्त करण्यासाठी नक्की कशाचा मुहूर्त पाहिला जात आहे. शासन कोणाचा बळी जाण्याची वाट पाहात आहे का? 

- सुरेंद्र मोरे, माजी नगरसेवक, दहिवडी 

(संपादन ः संजय साळुंखे) 

बाप्पांच्या जयघाेषात साताऱ्यात एसटी सुरु ; अशा आहेत गावांच्या फेऱ्या

loading image
go to top