esakal | साताऱ्यात एक हजारावर गावांना कोरोनाचा विळखा
sakal

बोलून बातमी शोधा

karad

गेल्या सात महिन्यांत सातारा जिल्ह्यातील तब्बल एक हजार 60 गावे कोरोनाच्या संसर्गात आली आहेत, तर अद्यापही 659 गावांनी कोरोनाला गावच्या हद्दीबाहेरच रोखण्यात यश मिळवले आहे. 

साताऱ्यात एक हजारावर गावांना कोरोनाचा विळखा

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोना संसर्गाचा वेग वाढला असून, त्यासोबतच बाधित रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल एक हजार 60 गावे कोरोनाच्या संसर्गात आली आहेत. त्यामध्ये सातारा व कऱ्हाड तालुक्‍यांतील सर्वाधिक गावे आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 659 जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये सातारा तालुक्‍यातील सर्वाधिक 189 रुग्णांचा, तर त्यापाठोपाठ कऱ्हाड तालुक्‍यात 128 रुग्णांचा समावेश आहे. 

गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 23 हजार 949 वर गेली आहे. समूह संसर्ग आणि वाढलेल्या चाचण्यांमुळे दररोज बाधितांचा आकडा आठशे ते हजारांच्या घरात जात आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. कुठे बेड मिळेल, हे शोधण्यासाठी रुग्ण व नातेवाईकांची ससेहोलपट सुरू आहे. जिल्ह्यात एक हजार 719 गावे असून, आतापर्यंत तब्बल एक हजार 60 गावे कोरोना विळख्यात आली आहेत. अद्यापही 659 गावांनी कोरोनाला गावच्या हद्दीबाहेरच रोखल्याचे चित्र आहे. तरीही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता समूह संसर्ग आणि बाधितांच्या निकट सहवासितांमुळे ही गावेदेखील संसर्गात येण्याची भीती आहे. शासनाने घरनिहाय प्रत्येक व्यक्तीची तपासणीची शोधमोहीम मंगळवारपासून (ता. 15) हाती घेतली आहे. आता हायरिस्कमधील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना कोरोनापासून दूर ठेवण्याच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. दिवसेंदिवस बाधित गावांची संख्या वाढत आहे. त्यातही एक पाऊल पुढे राहून 659 गावांनी अद्यापपर्यंत गावच्या हद्दीत कोरोनाचा शिरकाव होऊ दिलेला नाही. आगामी काळात या गावांनी सतर्क राहून गावातील कोणीही कोरोना संसर्गित होऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. 

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. दररोज 25 ते 35 बाधितांचा मृत्यू होत आहे. त्यामध्ये बहुतांश रुग्ण हे वेळेत उपचार न मिळाल्याने मृत झालेले दिसतात. आतापर्यंत 658 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये इतर आजार असलेले व 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 


बाधित गावांची तालुकानिहाय संख्या 
जिल्ह्यातील कोरोनाचा शिरकाव झालेल्या गावांमध्ये कऱ्हाड व सातारा तालुक्‍यांतील गावे अधिक आहेत. त्यामध्ये कऱ्हाड- 164, सातारा- 151, कोरेगाव- 93, खटाव- 84, पाटण- 145, फलटण- 96, वाई- 87, खंडाळा- 57, माण- 80, जावळी- 80, महाबळेश्‍वर 23 अशा संख्येत गावे आहेत. 

तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या 
सध्या बाधित रुग्णांचा जिल्ह्यातील एकूण आकडा 23 हजार 949 वर गेला आहे. त्यात तालुकानिहाय बाधितांची संख्या ः जावळी- 1116, कऱ्हाड- 6,308, खंडाळा- 1,489, खटाव- 1,307, कोरेगाव- 1,992, माण- 778, महाबळेश्‍वर- 679, पाटण- 1,066, फलटण- 1,683, सातारा- 5,149, वाई- 2,108, इतर जिल्ह्यातील- 274. 

तालुकानिहाय बाधित मृतांची संख्या 
कोरोनाने मृत्यू झालेल्यांची तालुकानिहाय संख्या : जावळी- 24, कऱ्हाड- 128, खंडाळा- 26, खटाव- 64, कोरेगाव- 39, माण- 16, महाबळेश्‍वर- 8, पाटण- 45, फलटण- 42, सातारा- 189, वाई- 72, इतर जिल्ह्यातील- 2. 

संपादन ः संजय साळुंखे 

साताऱ्यात 1300 ऑक्‍सिजन बेडची आवश्यकता; उपचाराविना जातोय 20 रुग्णांचा जीव 

loading image
go to top