साताऱ्यात 1300 ऑक्‍सिजन बेडची आवश्यकता; उपचाराविना जातोय 20 रुग्णांचा जीव

उमेश बांबरे
Monday, 14 September 2020

सध्या छत्रपती शिवाजी संग्रहालय, काशीळचे ग्रामीण रुग्णालय व कऱ्हाडातील दोन ठिकाणी ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; पण निधीअभावी वेळ जात आहे.

सातारा : कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता जिल्ह्यात ऑक्‍सिजन बेड व व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. वेळेत व्हेंटिलेटर आणि ऑक्‍सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्या 20 ते 25 रुग्णांचा दिवसभरात मृत्यू होत आहे. त्यासाठी जिल्ह्याला 250 व्हेंटिलेटर्स, तसेच 1300 ऑक्‍सिजन बेडची तातडीने आवश्‍यकता आहे. या कमतरतेमुळे उपचारासाठी आरोग्य विभागाला मर्यादा येत आहेत. शासनाने तातडीने व्हेंटिलेटर्स व ऑक्‍सिजन बेडची उपलब्धता करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांतून व्यक्त होत आहे.
 
सातारा जिल्हा गेली सात महिने कोरोनाशी झुंज देतो आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग, पोलिस, तसेच काही स्वयंसेवी संस्था, व्यक्तींचा सहभाग आहे, तरीही कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश येत नाही. सध्या बाधित रुग्णांचा आकडा 22 हजारांवर गेला असून, येत्या आठवडाभरात हा आकडा 28 ते 30 हजारांपर्यंत जाण्याची भीती आरोग्य विभागामधील सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या आठ हजार 400 वर गेली आहे, तर दररोज 15 ते25 च्या दरम्यान मृत्यू होत असून, आतापर्यंत 600 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

शोध कोरोनाबाधितांचा : उद्यापासून सातारा जिल्ह्यात प्रत्येक घरात तपासणी माेहिम
 
कोरोना रोखण्यासाठी चाचणीचे प्रमाण जिल्हा प्रशासनाने वाढविले आहे. दररोज हजारांवर रुग्णांची चाचणी घेतली जात आहे. त्यात सुमारे 700 ते 800 रुग्ण बाधित आढळत आहेत. त्यामुळे दररोज सापडणाऱ्या रुग्णांवर उपचार करताना आरोग्य विभागापुढे मर्यादा येत आहेत. सध्या गरज आहे ती गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर आणि ऑक्‍सिजन बेडची; परंतु तीही वेळेत न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत मिळून एकूण 114 व्हेंटिलेटर बेड असून, आणखी 247 व्हेंटिलेटर्सची गरज आहे, तर ऑक्‍सिजन बेडची संख्या जिल्हा कोरोना हॉस्पिटलमध्ये 174, जिल्हा कोरोना हेल्थ केअर सेंटरमध्ये 656, तर शासकीय रुग्णालयात 396, इतर रुग्णालयांत 700 असे एकूण 1171 ऑक्‍सिजन बेड उपलब्ध आहेत. हे सर्व बेड पुरेसे नाहीत. त्यामुळे आणखी 1300 ऑक्‍सिजन बेडची तातडीने आवश्‍यकता आहे; पण नव्याने बेड उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभागाची धडपड सुरू आहे.

खंडाळ्यातील 18 सप्टेंबरपर्यंतचा बंद मागे

सध्या छत्रपती शिवाजी संग्रहालय, काशीळचे ग्रामीण रुग्णालय व कऱ्हाडातील दोन ठिकाणी ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; पण निधीअभावी वेळ जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन सातारा जिल्ह्याला आवश्‍यक असलेली 250 व्हेंटिलेटर्स व 1300 ऑक्‍सिजन बेडची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न करावेत, तरच जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ventilators Bed Requirement Increased Satara News