लग्नानंतर देवाचा गोंधळ पडला महागात!, पेठ किन्हईत झाला कोरोनाचा शिरकाव

साहेबराव होळ 
Tuesday, 4 August 2020

पेठ किन्हईतील गोंधळी कलाकार आजूबाजूच्या गावात लग्नानंतरचा गोंधळ घालण्यासाठी आपल्या वाद्यांसह गेले होते. परत आल्यानंतर गोंधळ्याला श्वास घ्यायला त्रास, डोकेदुखी व ताप आल्याने वैद्यकीय उपचार घेण्यासाठी गेल्यानंतर कोरोनाची लक्षणे दिसून आली. 

गोडोली (जि. सातारा) : पेठ किन्हई (ता. कोरेगाव) येथील गोंधळी कलाकार लग्नानंतरच्या गोंधळाला आपल्या सहकाऱ्यांसह परगावी जाऊन आला अन्‌ कोरोनाबाधित झाला. परिणामी आजपर्यंत पेठ किन्हई व किन्हईत कोरोनाला प्रवेश मिळू नये म्हणून सरपंच व ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नाला अपयश आले असून, पेठ किन्हईत अखेर कोरोनाने प्रवेश केला आहे. संबंधित गोंधळी कलाकाराचा साथीदार किन्हईतील असल्याने त्याला बेंदवस्तीतील प्राथमिक शाळेत विलगीकरणात ठेवले आहे. मात्र, पेठ किन्हई व किन्हई येथील ग्रामस्थ कोरोनाच्या प्रवेशामुळे हादरले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, गेले चार महिने किन्हई व पेठ किन्हईत कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामसुरक्षा समिती, सरपंच व शासकीय कर्मचाऱ्यांनी गावची प्रवेशव्दारे बंद केली होती. शासनाने जमावबंदी शिथिल केल्याने गावच्या सर्व भागात लोकांची वर्दळ वाढली. अनेकजण मास्क व सॅनिटायझर वापरत आहेत. काहीजण अजूनही कोरोनाच्या आजाराकडे गांभीर्याने पाहात नाहीत. त्यातच गेल्या तीन ते चार दिवसांत पेठ किन्हईतील गोंधळी कलाकार आजूबाजूच्या गावात लग्नानंतरचा गोंधळ घालण्यासाठी आपल्या वाद्यांसह गेले होते. परत आल्यानंतर गोंधळ्याला श्वास घ्यायला त्रास, डोकेदुखी व ताप आल्याने वैद्यकीय उपचार घेण्यासाठी गेल्यानंतर कोरोनाची लक्षणे दिसून आली. ग्रामसुरक्षा समितीने लगेचच संबंधिताला पुढील उपचारासाठी पाठविले. त्याचा साथीदार किन्हईतील असल्याने त्याला जरी सध्या लक्षणे दिसत नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून गावाच्या पश्‍चिमेला असलेल्या बेंद वस्तीतील प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्षात ठेवले आहे. 

दरम्यान, शासकीय पातळीवरून हे कलाकार कोणकोणाच्या संपर्कात आले होते, त्याचा तपास करून संबंधितांनाही शोधून त्यांच्यावरही उपचाराची गरज असल्यास उपचार करण्याच्या तयारीत गुंतल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले. सध्या किन्हई व पेठ किन्हई या दोन्ही गावांत भीतीचे वातावरण आहे. एकंदरीत लग्नानंतरच गोंधळ गोंधळ्यासह किन्हई व पेठ किन्हई या दोन्ही गावांना महागात पडला, हे मात्र दुर्दैव म्हणावे लागेल. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Corona Entered Peth Kinhai