esakal | फलटणकरांनो काळजी घ्‍या... अखेर शहरात कोरोना आलाच...
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना

गेले 86 दिवस कोरोनापासून अलिप्त राहिलेल्या फलटणमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. फलटण शहरातील मंगळवार पेठेतील 62 वर्षीय सारीचा ताप असलेला पुरुष व रविवार पेठ येथील घरीच मृत्यू झालेल्या 70 वर्षीय वृद्धेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील कोरोनाचा शिरकाव स्पष्ट झाला आहे.

फलटणकरांनो काळजी घ्‍या... अखेर शहरात कोरोना आलाच...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूरवरून फलटणच्या रविवार पेठेत आलेल्या 70 वर्षीय महिलेचा घरीच मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिची घेतलेली कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याचबरोबर तळेगाव येथून मंगळवार पेठेत आलेल्या 62 वर्षीय पुरुषामध्ये सारीची लक्षणे आढळून आली होती. त्याचीही कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान, आजवर कोरोनास दूर ठेवलेल्या फलटण शहरात एकदम दोन जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. 

दरम्यान, संबंधित ठिकाणी प्रांताधिकारी शिवाजी जगताप, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे आदींनी भेट दिली. मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या निकटच्या सहवासित 22 जणांना शेती शाळेतील विलगीकरण कक्षात, तर अन्य चौघांना सोलापूर येथे विलगीकरणात ठेवले आहे. मंगळवार पेठेतील व्यक्‍तीच्या संपर्कात आलेल्या निकटच्या सहवासित 10 जणांना जाधववाडी येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर प्रांताधिकारी जगताप यांनी बारामती चौक ते माता रमाई चौक, भगवान सॉ मिल ते बारामती चौक हा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र, तर उर्वरित मंगळवार पेठेचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे. 

दरम्यान कालपर्यंत दोन हजार 855 जण होम क्वारंटाइन असून, त्यांचा चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही, तर कोरोना केअर सेंटरमधील बाधित वॉर्डमध्ये 12 जण, तर संशयित वॉर्डमध्ये 52 जण दाखल आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 52 जणांचा समावेश आहे. आज तीन जणांच्या चाचण्या घेतल्या आहेत. अद्याप चार अहवाल प्रलंबित आहेत. 

व्‍यथा प्रकल्‍पग्रस्‍तांची : आता दु:खही सोसवेना अन्‌ अन्नही खावेना...