कऱ्हाड तालुक्‍यात वाढली कोरोनाची गती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

कऱ्हाड तालुक्‍यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 213 वर पोचली आहे. तालुक्‍याने 48 दिवसांत 100 रुग्णांचा टप्पा ओलांडला, तर त्यानंतरच्या शंभर रुग्णांचा टप्पा अवघ्या 21 दिवसांत ओलांडला गेला आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : देशात व राज्यात 22 मार्चपासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर झाला. तालुका प्रशासनाने खबरदारी घेऊनही एक एप्रिलला तांबवे येथे तालुक्‍यातील पहिला बाधित रुग्ण आढळला. त्यानंतर अवघ्या आठवडाभरात म्हारुगडेवाडी येथे दुसरा रुग्ण आढळला. दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर महिनाभरात 50 बाधितांच्या उंबरठ्यावर तालुका पोचला. एक मे रोजी 50 रुग्णांचा आकडा गाठला. त्यानंतर अवघ्या 17 दिवसांत 18 मेपर्यंत आणखी 50 बाधित सापडल्याने तालुक्‍याने बाधितांचे शतक पूर्ण केले. त्यासाठी 48 दिवसांचा कालावधी लोटला. 

त्यानंतर बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. शतकानंतर पुढचे 50 रुग्ण अवघ्या आठच दिवसांत सापडल्याने तालुका प्रशासनासह आरोग्य यंत्रणा आवाक झाली. त्यानंतर 14 दिवसांत पुन्हा शंभर रुग्ण आढळल्याने तालुक्‍यात 69 दिवसांत दोनशेचा टप्पा ओलांडला. सुरवातीचे शंभर रुग्ण 48 दिवसांत, तर दुसऱ्या टप्प्यातील शंभर रुग्ण अवघ्या 21 दिवसांत सापडले. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात बाधित रुग्ण झपाट्याने वाढल्याचे स्पष्ट झाले. 

कोरोनाचा फटका तालुक्‍यातील 31 गावांना बसला. त्यात कऱ्हाड व मलकापूर शहरासह उंब्रज, हजारमाची, कापील, खोडशी, गमेवाडी, गोटे, चरेगाव, तांबवे, बनवडी, बाबारमाची, म्हारुगडेवाडी, रेठरे बुद्रुक, वनवासमाची, साकुर्डी, खालकरवाडी, इंदोली, भरेवाडी, शामगाव, मेरवेवाडी, शेरे स्टेशन, विंग, केसे, वडगाव (उंब्रज), शिंदेवाडी (विंग), पाल, तुळसण, खराडे, म्हासोली आदींचा समावेश आहे. यामध्ये वनवासमाची येथे सर्वाधिक 39, म्हासोली येथे 35, वानरवाडी, तुळसण येथे प्रत्येकी 16, शेरे स्टेशन येथे 11, तसेच मलकापूर येथे 42 बाधित आढळले आहेत. यातील कऱ्हाड व मलकापूर शहरासह उंब्रज, हजारमाची, कापील, खोडशी, गमेवाडी, गोटे, चरेगाव, तांबवे, बनवडी, बाबारमाची, म्हारुगडेवाडी, रेठरे बुद्रुक, वनवासमाची, साकुर्डी, खालकरवाडी, इंदोली, भरेवाडी, शामगाव, मेरवेवाडी, शेरे स्टेशन, विंग ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत.

बहुतेक सर्व बाधित बरे होऊन घरी परतले आहेत; पण उर्वरित आठ गावांत अद्यापही बाधित उपचार घेत आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र कायम आहे. दरम्यान, म्हारुगडेवाडी, मलकापूर व विंग येथील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. दाखल रुग्णांपैकी काही जण या आठवड्यात बरे होऊन घरी परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नव्याने रुग्ण न आढळल्यास तालुकाच कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. 

कोरोनामुक्‍तीची वाटही दृष्टिक्षेपात... 
सध्या 213 पैकी 186 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर तिघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 24 जणांवर उपचार सुरू आहेत. तालुक्‍यातील 31 बाधित गावांपैकी 23 गावे कोरोनामुक्त झाली असून, आठ गावांत अद्यापही प्रतिबंधित क्षेत्र लागू आहे. तेथील रुग्णांचीही प्रकृती सुधारत असल्याने येत्या काही दिवसांत कऱ्हाड तालुका कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर आहे. 
सातारा शहरात तीन क्षेत्रांत पूर्ण लॉकडाऊन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Corona Speed Increased In Karhad Taluka