दहिवडीकरांनो सावधान; माण तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट?

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

दहिवडी (जि. सातारा) : महत्प्रयासाने सामान्य नागरिकांच्या सहकार्यामुळे प्रशासनाने दहिवडी शहरातील कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आणला होता. मात्र, पुन्हा एकदा शहरात कोरोनाचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांनी सावधान होण्याची गरज आहे. शहराभोवतच माणमधील अनेक गावांमध्ये कोरोनाचा झालेला शिरकाव प्रशासनाची चिंता वाढविणारा आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात अन् त्यासोबतच माण तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती आहे. मागील काही दिवसांपूर्वी शहरात कोरोनाचा स्फोट झाल्यासारखी परिस्थिती होती. शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढले होते. बिकट झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण शहरात कित्येक दिवस कन्टेंटमेंट झोन लागू करण्यात आला होता. तसेच संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आले होते. मागील काही दिवस अपवादात्मक रुग्ण शहरात आढळत होते.

मात्र, आज शहरात एकाचवेळी नऊ कोरोनाबाधित आढळल्याने पुन्हा एकदा शहरात कोरोना डोके वर काढतो की काय अशी भीती सतावू लागली आहे. नागरिकांचा थोडासा निष्काळजीपणा शहराला पुन्हा संकटात नेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

शहरासोबतच माण तालुक्यातील शिंगणापूर 1, पांगरी 3, राजवडी 1, बिजवडी 3, जाशी 1, गोंदवले खुर्द 2, किरकसाल 1, दिवड 1, हिंगणी 1, म्हसवड 2, काळचौंडी 1, पळशी 1 व मोही 1 असे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे माण तालुक्यातील अनेक गावात झालेला कोरोनाचा शिरकाव धोकादायक ठरु शकतो. त्यामुळे माणच्या जनतेने प्रशासनाला सहकार्य करण्याची व शासनाने घातलेले निर्बंध पाळण्याची आवश्यकता आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com