आता तरी लोकाभिमुख कारभार करा; नगरविकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या

आता तरी लोकाभिमुख कारभार करा; नगरविकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या

सातारा : सातारा पालिका ही सातारकरांची नव्हे तर, मनमानी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आहे हे अनेकदा सिध्द झाले आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यानेच लाचखोरीसारखा निंदनीय प्रकार घडला असून पालिकेच्या गौरवशाली इतिहासाला काळीमा फासला गेला आहे. त्याचा निषेध करतानाच सातारकरांच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांनी पालिका प्रशासनावर अंकुश ठेवणे आवश्‍यक आहे, असे मत नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी व्यक्‍त केले आहे.
 
सातारा पालिकेच्या इतिहासात कधी घडला नाही असा प्रकार काल घडला आहे. उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, आरोग्य निरिक्षक गणेश टोपे, प्रवीण यादव आणि कायगुडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. सातारा पालिकेतच लाच घेताना वरिष्ठ अधिकारी रंगेहात सापडतात हे कशाचे दयाेतक आहे. सत्ताधारी सातारा विकास आघाडीचा प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. गेल्या साडेतीन वर्षांपासून सातारा पालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी सुरु आहे. सत्ताधारी अंतर्गत गटबाजी, गटतट यामध्येच अडकून पडले असल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे. सातारकरांनी नविआला विरोधात बसण्याचा कौल दिला. तो मान्य करुन नगर विकास आघाडी सक्षम विरोधकाची भूमिका बजावत आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून चुकीच्या गोष्टींना वेळोवेळी कठोर विरोध तर चांगल्या कामाला पाठिंबा देत नविआ नेहमीच प्रशासनाला वेसण घालण्याचा प्रयत्न करत आली आहे. 

जिल्हाधिकारी, सर्वसाधारण सभा यातून नविआची भुमिका सातत्याने स्पष्ट झाली असून यापुढेही चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. सातारा पालिका ही सातारकरांची मातृसंस्था आहे, याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे. सत्ताधाऱ्यांना याचे भान नसल्यानेच पालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मनमानी करुन, नको त्या उचापती करत आहेत. किमान आता तरी सत्ताधाऱ्यांनी आपसातील मतभेद आणि गटबाजी विसरुन सातारकरांच्या हितासाठी पालिकेचा कारभार लोकाभिमुख करावा आणि प्रशासनावर अंकुश ठेवावा, जेणेकरुन लाचखोरीसारखे लाजीरवाणे आणि पालिकेच्या इतिहासाला काळिमा फासणारे प्रकार घडणार नाहीत, असे मोहिते यांनी पत्रकात म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com