esakal | Satara: जिल्ह्यात उफाळतोय मटक्यातून वर्चस्‍ववाद
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

साताऱ्यात उफाळतोय मटक्यातून वर्चस्‍ववाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : शहराच्‍या विविध भागांतील गल्‍लीबोळांत टपऱ्या टाकत पानबिडीच्‍या नावाखाली मटका घेण्‍यात येत आहे. या टपऱ्यांमधील मटक्‍यातून होणारी उलाढाल, व्‍यवसायावर पकड ठेवण्‍यासाठी होणाऱ्या बुकलाबुकलीमुळे सातारा शहरातील अनेक चौकात दररोज अशांतता निर्माण होत आहे. आगामी काळातील निवडणुकीत अशाच प्रकारे अवैध व्‍यवसाय करणाऱ्या मुख्‍य बुकींनी नशीब आजमविण्‍यासाठीचे प्रयत्‍न सुरू केले असून, त्‍यांच्‍या पाठबळावर शहरातील गल्‍लीबोळांत त्‍यांचे पंटर दिवस-रात्र धुडगुस घालत आहेत.

गल्‍लीबोळांतील अतिक्रमणे, टपऱ्या, त्‍या टपऱ्यांतील अवैध व्‍यवसायांमुळे सातारा शहराची कुप्रसिध्‍दी होत चालली आहे. पुढे-पाठीमागे चार-दोन टाळकी, गल्‍लीदादाचे पाठबळ, थोडाफार राजकीय आशीर्वादावर सातारा शहरातील गल्‍लीबोळांत गेल्‍या काही वर्षांत अनेक मटका बुकी तयार झाले आहेत. मनगटाच्‍या जोरावर विनाभांडवली मटक्यातून बरकत मिळवणे सोपे असल्‍याने रिकामटेकडे युवक त्‍यात शिरत आहेत. यातूनच इतर व्‍यवसायांप्रमाणे मटक्याचा शाखा विस्‍तार करण्‍यावरून एकमेकांच्‍या एरियात घुसखोरी होऊ लागली. या घुसखोरीमुळेच मटक्याच्‍या धंद्यात कार्यरत असणाऱ्या युवकांच्‍यात गेले काही दिवस धुमसाधुमसी सुरू आहे. या धुमसाधुमसीचे रूपांतर गंभीर हल्‍ल्‍यांत झाल्‍याच्‍या अनेक घटना यापूर्वी घडल्‍या आहेत.

हेही वाचा: Corona Update : राज्यातील रुग्ण आणि मृत्यूसंख्येत वाढ

अशीच एक घटना नुकतीच घडली असून, त्‍यामागे मटक्याच्‍या शाखा विस्‍ताराचा वाद कारणीभूत असल्‍याची चर्चा आहे. साताऱ्यातील अनेकांनी आपल्‍या व्‍यवसायाच्‍या शाखा इतर शहरांतदेखील सुरू केल्‍याची चर्चा असून, त्‍याठिकाणीही वादाचे अनेक प्रसंग घडल्‍याची चर्चा आहे. पोलिस काणाडोळा करत असल्‍याने मटक्याच्‍या जोरावर सर्वसामान्‍यांवर दहशत निर्माण करणाऱ्यांचे फावत आहे.

निवडणुकीच्‍या तोंडावर शक्‍तिप्रदर्शन

सातारा पालिकेची निवडणूक काही महिन्‍यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्‍या तोंडावर अनेकांनी राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मोर्चेबांधणी करणाऱ्यांमध्‍ये बहुतांश अवैध व्‍यवसाय करणाऱ्या युवकांचा मोठा समावेश आहे. छोटी-मोठी समाजकार्य करत असल्‍याचा आव आणत हे युवक स्‍वत:भोवती अवैध व्‍यवसायाशी निगडित युवकांचे कोंडाळे जमवत त्‍या कोंडाळ्याच्‍या जिवावर मुख्‍य बुकी राजकीय आतषबाजी करत आहेत.

हेही वाचा: बाधितांंना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले

तडीपारी कागदावरच

सार्वजनिक सण आणि महोत्‍सवाच्‍या पार्श्वभूमीवर गंभीर गुन्‍हे असणाऱ्यांना पोलिस यंत्रणा तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात तडीपार करते. तडीपार गुंड नंतरच्‍या काळात त्‍याच परिसरातील चौकात टोळके जमवून धांगडधिंगा घालत उभे असल्‍याचे सातारकर उघड्या डोळ्यांनी पाहात असतात. सराईत गुंड पोलिसांना जुमानत नसल्‍याने सर्वसामान्‍य नागरिक त्‍याविरोधात तक्रार करण्‍यास धजावत नाहीत. तडीपारी कागदोपत्रीच राहात असल्‍याने पोलिसांच्‍या आशीर्वादाने सुरू असणारी फाळकुटदादांची गुंडगिरी सातारकरांच्‍या अंगवळणी पडत चालली आहे.

loading image
go to top