आसनगावात संशयावरून युवकाला मारहाण; वडिलांसह दोन मुलांवर गुन्हा

प्रवीण जाधव
Wednesday, 13 January 2021

आसनगाव येथील युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गावातील एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नागठाणे (जि. सातारा) : आसनगाव (ता. सातारा) येथील युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गावातील एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जोपर्यंत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत युवकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला होता. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपत आण्णा पवार, महेश संपत पवार व गणेश संपत पवार (सर्व रा. आसनगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दीपक हणमंत पवार (वय 26) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी सकाळी दीपकने गावातीलच आरसड नावाच्या शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची उघडकीस आले होते. दीपक हा घरातील महिलेस काही तरी बोलला, या संशयावरून संपत पवार, महेश पवार व गणेश पवार यांनी त्याला गावात व त्यानंतर गावाबाहेरील माळावर नेऊन लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. 

भाजपचे संख्याबळ मोजण्यात अधिकाऱ्यांची चूक; जिल्हाधिकाऱ्यांचा निष्कर्ष

या वेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेला दीपकचा छोटा भाऊ सोनू, चुलते शंकर पवार, तसेच सरपंच मनोज गायकवाड, रामचंद्र पवार यांनाही संशयितांनी दमदाटी व मारहाण केली. या वेळी दीपक याला "उद्या तुला गावाच्या समोर मारतो,' अशी धमकी देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले, अशी फिर्याद शंकर पवार यांनी काल रात्री उशिरा बोरगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Crime News Case Has Been Registered Against Three Persons From Asangaon