जावयाच्या आत्महत्येप्रकरणी म्हसवडच्या सासू-सासऱ्यांवर इस्लामपुरात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 February 2021

विक्रांतचा विवाह 2016 रोजी सोनवणे यांची मुलगी प्राजक्ता हिच्यासोबत झाला होता.

इस्लामपूर : येथील शाहूनगरातील विक्रांत धनंजय शिंदे (वय 32) याने बुधवारी गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येप्रकरणी सासू-सासरे चंद्रकला व जयप्रकाश काका सोनवणे (रा. म्हसवड, ता. माण) यांच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विक्रांतची आई जयश्री यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विक्रांतचा विवाह 2016 रोजी सोनवणे यांची मुलगी प्राजक्ता हिच्यासोबत झाला होता. एका तरुणीसोबत विक्रांतचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून पत्नी प्राजक्ता ही गेल्या तीन वर्षांपासून वारंवार भांडत होती. 7 जुलै 2020 रोजी विक्रांत घरातून निघून गेला होता. प्राजक्ताने तो बेपत्ता झाल्याची फिर्याद 23 सप्टेंबरला पोलिसात दिली होती. प्राजक्ता व तिचे आई वडील त्या तरुणीच्या घरी जाऊन भांडण करून आले होते. त्यानंतर प्राजक्ता तिच्या मुलासोबत माहेरी गेली होती. 16 फेब्रुवारीला विक्रांत व त्या तरुणीने एका मंदिरात लग्न केले. दरम्यान विक्रांत इस्लामपूरला घरी आला. त्याने गुरुवारी घरात ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली होती. 

हे पण वाचा- लोकशाहीचे नव्हे, तर हे ठोकशाहीचे राज्य; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा

चिठ्ठीनुसार फिर्याद 

दरम्यान, पोलिसांना विक्रांतच्या कपड्यामध्ये चिठ्ठी मिळाली आहे. त्यातील मजकूर असा : मी दुसरे लग्न केल्यानंतर सासऱ्यांनी दुसऱ्या पत्नीसह कवठेमहांकाळमधून आणून मला मारहाण केली. विवाहाचे सर्व पुरावे नष्ट केले आहेत. मला मारून टाकण्याच्या भीतीने ती तरुणी शांत राहिली. सासू-सासऱ्यांनी जयप्रकाश सोनवणे व सासू चंद्रकला यांनी सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी भाग पाडले. मोठा गुन्हेगार हा जयप्रकाश आहे. त्याने सर्व कट रचला आहे. मला आत्महत्या करण्यास सांगितले आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Crime News Case Registered Against Two Persons From Mhaswad At Islampur Police Station