डिझेल चोरणाऱ्या चार झारखंडच्या परप्रांतियांना कऱ्हाडात अटक

राजेश पाटील
Sunday, 17 January 2021

काही दिवसांपूर्वीच ढेबेवाडी येथील बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमधून रात्रीच्या सुमारास डिझेल चोरीचा प्रयत्न झाला होता.

ढेबेवाडी (जि. सातारा) : रस्त्याच्या बांधकामासाठी आणलेल्या जेसीबी व पोकलॅनमधील डिझेल चोरीप्रकरणी चार परप्रांतीय ऑपरेटर्सना येथील पोलिसांनी अटक केली. पाटण न्यायालयाने आज त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. (Jharkhand) 

याबाबत पोलिसांची माहिती अशी, ढेबेवाडी विभागातील आंब्रुळकरवाडी ते अनुतेवाडी (जिंती) या डांबरी रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी कंपनीची जेसीबी, पोकलॅन मशिन व अन्य यंत्रणा कार्यरत असून त्यावर ऑपरेटर म्हणून रणजित रामेश्वर दास, अकरम अली अन्सारी, इरशाद दिलमहंमद अन्सारी, एकरामुल नईम अन्सारी (सर्व सध्या राहणार अनुतेवाडी- जिंती, मूळगाव- हजारीबाग- झारखंड) हे चौघे काम करत आहेत. कंपनीमार्फत या मशिन्समध्ये नियमित डिझेल भरणा केला जातो. परंतु; मागील महिन्यापासून मशिनमधील कमी होणारे डिझेल आणि प्रत्यक्षात मशिनकडून करण्यात आलेले काम यामध्ये तफावत आढळल्याने डिझेल चोरी होत असल्याची शंका कंपनी व्यवस्थापनास आली होती.

राष्ट्रीय सुरक्षेची माहिती एका न्यूज अँकरला कशी मिळाली?; अर्णब गोस्वामीप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारला खडा सवाल  

त्यानुसार कंपनीने कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यातूनच ही चोरीची घटना समोर आली. रात्री मशिन बंद केल्यावर टाकीतील डिझेल पाइपव्दारे कॅनमध्ये काढून घेत कुठे तरी त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रत्यक्ष खात्री करण्यात आली. त्यावेळी तिन्ही मशिनमध्ये 105 लिटरची तफावत आढळल्याने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार चौघांना अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रवींद्र पानवळ तपास करत आहेत.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला किसानचा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध  

जुन्या डिझेल चोऱ्यांवर उजेड पडणार? 

काही दिवसांपूर्वीच येथील बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमधून रात्रीच्या सुमारास डिझेल चोरीचा प्रयत्न झाला होता. चालक व वाहकास जाग आल्याने त्यावेळी चोरट्यांनी बसच्या डिझेल टाकीत घातलेली पाइप व कॅन तिथेच सोडून पळ काढला होता. सध्या पोलिसांच्या हाती लागलेल्या चोरट्यांकडून डिझेल चोरीच्या जुन्या घटनांवर प्रकाश पडणार का, या प्रकरणातील साखळी पोलिस शोधणार का, याबद्दल जनतेत उत्सुकता आहे.

कऱ्हाडात अनधिकृत खोक्‍यांवर मेहरबानांची मेहरनजर?; स्वच्छ सर्वेक्षणाला अडथळा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Crime News Four Diesel Thieves Arrested In Karad