लागणीपूर्वीच "या' प्राण्याकडून तरवांचे वाफे फस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

पाटण तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. त्यामुळे सहाजिकच डोंगराळ भागात वन्यप्राण्यांचाही वावर आहे. मात्र, यातील काही वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. ढेबेवाडी विभागातील निवी, कसणीसह परिसरातील शिवारातील भात, नाचणीसह वरीचे तरु गव्यांनी फस्त करायला सुरवात केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

ढेबेवाडी (जि. सातारा) : पावसाच्या उघडिपीमुळे वाफ्यातच पडून असलेले भात पिकासह नाचणी व वरीचे तरू गव्यांनी फस्त करायला सुरुवात केल्याने विभागातील निवी, कसणीसह आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आता रोप लावणी करायची कशी? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. नुकसानीची मालिका अशीच कायम राहिल्यास त्या परिसरात पडीक क्षेत्र वाढण्याचीही भीती आहे. 

विभागातील निवी, कसणीसह अनेक गावे सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील घनदाट जंगलालगत वसलेली असून, वन्यप्राण्यांचा तेथे सतत उपद्रव जाणवतो. हातातोंडाशी आलेली पिके रानडुकरे आणि गव्यांच्या कळपांकडून फस्त केली जात असल्याने अलीकडे तेथील अनेक शेतकऱ्यांनी शेती न करता पोटापाण्यासाठी मुंबई गाठली आहे. पडीक क्षेत्र वाढल्याने सातबाऱ्यावर जमीनदार असलेल्या कुटुंबांवरही दुसऱ्या गावात शेतमजूर म्हणून राबायची वेळ आलेली आहे. एकीकडे पडीक क्षेत्र वाढत असताना दुसरीकडे तेथील शेतकरी एकत्र येऊन जागत्या पहाऱ्याद्वारे पीक राखणीचा धाडसी प्रयत्न करतानाही दिसत आहेत. मात्र, तरीही डोळा चुकवून वन्यप्राणी शिवारात घुसतच असल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे. आता तर रोप लागणीपूर्वीच गव्यांनी भात, नाचणी आणि वरीच्या तरवांचे वाफे फस्त करायला सुरुवात केल्याने रोप लागण करायची तरी कशी? असा प्रश्न उभा आहे. 

शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंगर भागातील हीच प्रमुख पिके असून, लागणीपूर्वी तीन आठवडे त्या-त्या शिवारात तरूचे वाफे केले जातात. यंदा शिवारे व तरवे तयार आहेत; परंतु पावसाने ओढ दिल्याने रोप लावणी रखडली आहे. तोवरच गव्यांनी तरवांचे वाफे फस्त करायला सुरुवात केली आहे. गव्यांचे कळप रातोरात वाफ्यातील तरू खरवडून खात आहेत. चार दिवसांत सुमारे 30 एकरांला पुरेल एवढे तरू फस्त केले असून, दररोज पाच- सहा वाफे खाल्ल्याच्या बातम्याही कानावर येत आहेत. 

भात, नाचणी व वरीच्या वाफ्यातील रोपांची गव्यांनी वाट लावली आहे. वन विभागाकडून शिवारातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होतात; परंतु वाफ्यातील रोपांच्या नुकसानीचे काय? रोपांवरून लागवडीखालील क्षेत्र गृहीत धरून भरपाई मिळायलाच पाहिजे. 

- मारुती ऊर्फ बाळू पाटील, अध्यक्ष, वन व्यवस्थापन समिती, निवी 

 

कांद्याचा भार आता एसटी पेलणार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara croft from animals before planting