लोकमान्य टिळकांचे 100 पुतळे बनवणार, पुण्यतिथी शताब्दीनिमित्त डॉ. पुजारींचा संकल्प

मुकुंद भट 
Wednesday, 5 August 2020

विशेष बाब म्हणजे टिळकांच्या या पुतळ्यांसाठी डॉ. संजय पुजारी यांनी रेशमी कापडाच्या पगड्या, उपरणेही स्वतः तयार केली आहेत. तसेच नायलॉन धाग्यांच्या कृत्रिम मिशा, डोळ्यांच्या हुबेहूब भुवयाही साकारल्या आहेत. 

ओगलेवाडी (जि. सातारा) : यंदा लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे शताब्दी वर्ष साजरे होत आहे. तसेच "शिक्षण मंडळ कराड'चे स्थापनेचे 100 वे वर्ष आहे. यानिमित्ताने येथील आत्माराम विद्यामंदिरातील विज्ञान शिक्षक डॉ. संजय पुजारी यांनी आपल्या हस्तकौशल्याने लोकमान्यांचे विविध भावमुद्रेतील शाडूमातीचे आकर्षक व रेखीव सिरॅमिक रंगाचे 100 पुतळे तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प केला आहे. त्यामुळे नव्या पिढीस लोकमान्य टिळक यांच्या स्मृतींना उजाळा मिळणार असून, प्रेरणा व स्फूर्ती मिळणार आहे. 

विशेष बाब म्हणजे टिळकांच्या या पुतळ्यांसाठी डॉ. पुजारी यांनी रेशमी कापडाच्या पगड्या, उपरणेही स्वतः तयार केली आहेत. तसेच नायलॉन धाग्यांच्या कृत्रिम मिशा, डोळ्यांच्या हुबेहूब भुवयाही साकारल्या आहेत. डॉ. पुजारी यांनी टिळकांच्या पुतळ्यांच्या कलाकृती करून कोरोना लॉकडाउनच्या सुटीचा सदुपयोग केलेला आहे. त्यासाठी त्यांना प्रमोद अंगरखे व सतीश उपळेकर यांचे साह्य मिळाले. 

मागील वर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये आत्माराम विद्यामंदिरातील 100 विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांची वेशभूषा करून लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली. तसेच विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखांमधील गाजलेली "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे', "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का,' आदी वाक्‍ये एकासुरात म्हटली होती. शाळेतील संपूर्ण वातावरण अक्षरशः टिळकमय झाले होते. लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेतील सर्व वेशभूषा आणि लागणाऱ्या पगड्या शाळेतच तयार केल्या होत्या. 

कऱ्हाड येथे डॉ. पुजारी यांनी डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्राची स्थापना केली असून, ते संस्थापक सचिव आहेत. विज्ञान केंद्रात 200 प्रयोगांची मांडणी केलेली आहे. विज्ञान कार्यशाळेचा 14 वर्ष उपक्रम आजही सुरू आहे. त्यांनी भारतात "वेध अवकाशाचा' या विषयावर प्रतिकृती व स्लाइड शोद्वारे सुमारे 800 व्याख्याने दिली आहेत. त्यांना विज्ञान प्रसार कार्याबद्दल भारत सरकारचा माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. "धमाल विज्ञानाची' या बालचित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली आहे. तसेच विज्ञान प्रसार व पर्यावरण जागृतीसाठी विशेष बाहुलीनाट्याची (पपेट शो) निर्मिती केली आहे. डॉ. पुजारी यांना राज्यस्तरीय साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार व स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार मिळाला आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Determination To Make 100 Statues Of Lokmanya Tilak