Satara: जयकुमार गोरे, रणजितसिंहांच्या माघारीचे गूढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara District Bank

सातारा : जयकुमार गोरे, रणजितसिंहांच्या माघारीचे गूढ

सातारा : जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक पॅनेलच्या विरोधात भाजपप्रणित सर्वसमावेशक पॅनेलची खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखलही केले होते. पण, आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दोघांनीही समर्थकांसह अनपेक्षितरित्या उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सस्पेन्सच संपला. ऐन निवडणुकीतून माघार का घेतली, याची उत्सुकता लागली असून येत्या दोन दिवसांत ते याबाबतचे विश्लेषण करणार आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना खासदार उदयनराजे भोसले व जयकुमार गोरे यांची सर्वाधिक भीती वाटत होती. ही मंडळी एकत्र येऊन राष्ट्रवादीला आव्हान देऊ शकतील, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. त्यानुसार उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी रणजितसिंह व जयकुमार गोरे यांनी आपल्या काही समर्थकांसह शासकीय विश्रामगृहातून चालत येत शक्‍तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना आम्ही दोघांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित सर्वसमावेशक पॅनेल टाकणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत या दोन्ही नेत्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. उदयनराजेंना होणाऱ्या विरोधाचा फायदा घेऊन त्यांना भाजपच्या पॅनेलमध्ये घेण्याबाबतही चर्चा केली नाही.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

यासोबतच राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे नाराज असलेल्‍या मंडळींमध्ये ॲड. उदयसिंह पाटील, प्रभाकर घार्गे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आदी मंडळी भाजपप्रणित पॅनेलच्या संपर्कात जातील, असेही वाटले होते. पण, तशा कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. आमदार गोरे व खासदार निंबाळकर हे दोघेही अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत शांत राहिले. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर त्यांनी टीकाही केली नाही. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी दोन्ही नेते जिल्हा बँकेत आले व त्यांनी इतर मतदारसंघातून दाखल केलेले समर्थकांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुखद धक्काच बसला.

जयकुमार गोरे आणि रणजितसिंह यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार का घेतली, याची उत्सुकता जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह जनतेलाही लागली आहे. येत्या दोन दिवसांत आमदार जयकुमार गोरे हे याबाबतचे विश्लेषण करून आपली भूमिका मांडणार आहेत.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ Live : मॅच रंगतदार स्थितीत

अन्‌ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंदीत...

पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, राजेंद्र राजपुरे यांची खलबते आज जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी सुरू होती. गोरे, निंबाळकरांनी आपल्या समर्थकांचे अर्ज मागे घेतल्याचे समजताच या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. राष्ट्रवादीच्या पॅनेलविरोधात भाजपप्रणित पॅनेल होणार नाही, याची खात्री झाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

loading image
go to top