कोरोना मृत्यूदर रोखण्यासाठीचा साताऱ्याचा हा प्लॅन ठरू शकतो राज्यासाठी आयडॉल

कोरोना मृत्यूदर रोखण्यासाठीचा साताऱ्याचा हा प्लॅन ठरू शकतो राज्यासाठी आयडॉल

सातारा : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा वाढता मृत्यूदर रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाबाधितांवर योग्य उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी ऍक्‍शन प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांवरील उपचार अधिक चांगले होणार आहेत. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वेगाने वाढत आहे. कोरोनाबाधितांमध्ये सरासरी दिवसाला 30 ते 40 रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1372 झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण कोरोनामुक्त होण्याची संख्याही चांगली आहे. आजपर्यंत तब्बल 813 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यातून आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाचे कोरोनाबाबतचे एकूण काम समाधानकारक दिसते आहे. परंतु, गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढू लागलेले आहे. बरेच दिवस जिल्ह्याचे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण हे राज्याच्या तुलनेत कमी होते. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा दर अडीच ते तीन टक्‍यांपर्यंत राहात होता. परंतु, गेल्या काही दिवसांत मृत्यू वाढल्याने आता हा मृत्यूदर 4.15 वर गेला आहे. त्यामुळे हा मृत्यूदर कमी आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने पावले उचलायला सुरवात केली आहे. 

या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काल जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कामकाजातील अडचणी तसेच अधिक प्रभावीपणे काम होण्यासाठी कोणत्या
उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, याची माहिती जाणून घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सांगण्यासाठी त्यांनी चांगले वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही आपली मते ठामपणे मांडली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील एकंदर उपचार अधिक प्रभावी होण्यासाठी "ऍक्‍शन प्लॅन' तयार करण्यात आला आहे. 

कोरोनाबाधितांवर प्रभावी उपचार होण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामाच्या ड्युटीची रचना चक्राकार पद्धतीने करण्याची मागणी केली. त्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक टीम सलग सात दिवस रुग्णांना मॉनिटर करू शकते. त्यामुळे रुग्णाची अधिक चांगली काळजी घेतली जाऊ शकते तसेच उपचारही होऊ शकतात. या पद्धतीने रचना करण्यास आवश्‍यक असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भरून काढण्याचा मार्गही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला. या
कामासाठी आता "एनआरएचएम'च्या माध्यमातून विविध कामांसाठी नेमलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही कोरोना उपचारांच्या कामात सामावून घेतले जाणार आहे.

 
वैद्यकीय अधिकारी योग्य पद्धतीने जबाबदारी पार पाडतात का, फिजिशिअनने दिलेली उपचार पद्धती योग्यरित्या पाळली जाते का, हे पाहण्यासाठी आता दररोज वर्ग एक दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामध्ये
जिल्हा शल्यचिकित्सकांसह जिल्हा रुग्णालयातील सर्व वर्ग एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सामावून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदारी असणाऱ्या दिवशी रुग्णालयातील वॉर्डमध्ये राउंड
घेऊन एकंदर उपचार व्यवस्था योग्य राखण्याचे काम करावे लागणार आहे. त्याचबरोबर कोरोना वॉर्डमधील काम योग्य पद्धतीने होण्यासाठी अधिक परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असल्याचा मुद्दा समोर आला. त्यावरही परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधितांवर उपचार अधिक प्रभावी होणार आहेत. 

डॉ. पी. डी. कारंजकरांचे कौतुक 

कोरोना रुग्णांवर उपचाराचे काम करणाऱ्या सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक जिल्हाधिकाऱ्यांनी केले. परंतु, खासकरून डॉ. कारंजकर यांचे नाव पुढे आले. त्यांच्याकडून अत्यंत चांगले काम होत असल्याचे सर्वच फिजिशिअन्सनी सांगितल्याचे
स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी कबूल केले. डॉ. कारंजकर यांच्या निवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. त्यांना मधुमेहही आहे. तरीही ते कोरोना बाधितांच्यावरील उपचाराची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. स्वाइन फ्लूच्या
काळातही जिल्हा रुग्णालयातील रुग्णांचा डोलारा सांभाळण्याचे काम त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडून झालेले कौतुक त्यांच्या कामाची खरी पोचपावती ठरली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com