ग्रामपंचायत निवडणूक खर्च न देणे ७० जणांना भोवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchyat

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून मिरविले; पण निवडणुकीत केलेल्या खर्चाचा तपशील देण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यातील ७० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे.

Grampanchyat Election : ग्रामपंचायत निवडणूक खर्च न देणे ७० जणांना भोवणार

सातारा - ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून मिरविले; पण निवडणुकीत केलेल्या खर्चाचा तपशील देण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यातील ७० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान, झालेल्या जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील हे उमेदवार आहेत. त्यांनी दिलेल्या महिनाभराच्या मुदतीत जमा- खर्च केलेला नाही. यामध्ये सातारा व कऱ्हाड तालुक्यांतील सर्वाधिक सदस्यांचा समावेश आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून मिरवण्याची अनेकांना सवयी असते. यामुळे एका वॉर्डमधून अनेक जण निवडणूक लढवतात. निवडणूक लढणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत केलेल्या खर्चाचा तपशील द्यावा लागतो. त्यासाठी उमेदवाराचा एक बॅंक खाते क्रमांक निवडणूक विभागाला लिंक केलेला असतो. निवडून आलेल्या उमेदवारांसह बिनविरोध, पराभूत उमेदवार असलेल्या उमेदवारांना केलेल्या खर्चाचा तपशील आयोगाला देणे बंधनकारक आहे. अनेकदा बिनविरोध झालेले उमेदवार याकडे दुर्लक्ष करतात.

सर्वात जास्त पराभूत उमेदवारांचा खर्च न देण्यामध्ये समावेश असतो; पण काही निवडून आलेले उमेदवारही खर्च निवडणूक विभागाकडे सादर करत नाहीत. अशा उमेदवारांवर जिल्हाधिकारी अपात्रतेची कारवाई करतात. संबंधित सदस्य पराभूत असलेल्यास त्याला पुढील पाच वर्षे निवडणूक लढता येत नाही, अशी कारवाई होते.

जिल्ह्यात गेल्या तीन, चार महिन्यांपासून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर डिसेंबरमध्ये ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यातील पहिल्या टप्प्यात झालेल्या ३५ ग्रामपंचायत निवडणुकीतील ७० उमेदवारांनी अद्याप निवडणूक खर्च जमा केलेला नाही.

त्यामुळे या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ते निवडून आलेले असतील तर ते अपात्र ठरतील, मात्र, पराभूत असतील तर त्यांना आगामी पाच वर्षे निवडणूक लढता येणार नाही, अशी कारवाई होणार आहे. यामध्ये सर्वाधिक सदस्य सातारा व कऱ्हाड तालुक्यांतील असून, या सदस्यांवर कारवाई होणार आहे.

गुरुवारपर्यंत मुदत...

नुकत्याच ३१९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम संपला. यामध्ये उमेदवार असलेल्या सर्वांनी १९ जानेवारीपर्यंत खर्च सादर करायचा आहे. त्यासाठी निवडणूक शाखेने या उमेदवारांना खर्च सादर करण्याचे आवाहन केले आहे.