गणेशोत्सवात वर्गणीची सक्ती नको, वाईत पोलिस उपअधीक्षकांचा इशारा

भद्रेश भाटे 
Thursday, 13 August 2020

उत्सवातील धार्मिक कार्यक्रम, आरती करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायझर व मास्कचा वापर करावा. शक्‍यतो देखावा करू नये, म्हणजे लोकांची गर्दी होणार नाही. तसेच उत्सव काळात कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले. 

वाई (जि. सातारा) : गणेशोत्सवात आपापल्या गावात व भागात कोरोना विषाणूचा संसर्ग होणार याची दक्षता प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाने घ्यावी. त्यासाठी "एक गाव, एक गणपती, एक प्रभाग, एक गणपती' ही संकल्पना अंमलात आणावी. कोणालाही वर्गणीची सक्ती न करता जमा होणाऱ्या वर्गणीचा सामाजिक व विधायक कामासाठी वापर करावा. केवळ धार्मिक कार्यक्रम पार पाडून साध्या पद्धतीने उत्सव साजरा करून इतरांना आदर्श घालून द्यावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले. 

येथील बाजार समितीचे शेतकरी बहुद्देशीय सभागृहात वाई पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेश मंडळे व शांतता समितीच्या बैठकीत श्री. टिके बोलत होते. या वेळी नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपाध्यक्ष अनिल सावंत, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांची उपस्थिती होती. श्री. टिके म्हणाले, ""कोरोनाबाबत समाजात विसंगती दिसते. मात्र, हा कोरोना विषाणू घातक आहे. त्यामुळे गणेशोत्सवात सर्वांनी आपली व इतरांची काळजी घ्यावी. उत्सवातील धार्मिक कार्यक्रम, आरती करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायझर व मास्कचा वापर करावा. शक्‍यतो देखावा करू नये, म्हणजे लोकांची गर्दी होणार नाही. तसेच उत्सव काळात कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कोरोनामुळे होरपळलेल्या समाजातील उपेक्षित घटकांना प्रत्येक मंडळाने मदत करावी.'' 

पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे म्हणाले, ""गेल्या काही दिवसांत शेंदूरजणे, पसरणी, बावधन व वाई शहरात कोरोनाबधितांची संख्या वाढली असून, हा संसर्ग अधिक वाढू नये, यासाठी गणेशोत्सव साजरा करताना सर्व मंडळांनी व भक्तांनी शासनाच्या अटी व नियमांचे पालन करावे. जिल्ह्यात 144 कलम लागू असल्यामुळे प्रतिष्ठापना, विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. सार्वजनिक मूर्तीची उंची चार फूट आणि घरगुती मूर्तीची उंची दोन फूट एवढी मर्यादित असावी. सार्वजनिक जागेवर मंडप उभारण्यास, स्पीकर, पारंपरिक वाद्ये व डॉल्बीचा वापर यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. तेव्हा शक्‍यतो मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना करावी. लॉकडाउनमुळे बाजारपेठेत आर्थिक मंदी असल्याने वर्गणीची सक्ती करू नये. उत्सवातील अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन समाजातील गरजू, उपेक्षितांना, हुतात्मा जवान, कोरोनायोद्धे यांना मदत करवी. समाजात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.'' 

नगराध्यक्षा डॉ. शिंदे यांनी उत्सव काळात सार्वजनिक मंडळांसह पोलिस प्रशासनाला पालिका सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगितले. कृष्णा नदी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दररोज शहरातील निर्माल्य जमा करण्यात येणार आहे. बहुतेक मंडळांची मंदिरे असून, त्यात प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नगरसेवक चरण गायकवाड, राजेश गुरव, काशिनाथ शेलार, रवी बोडके आदींनी मनोगत व्यक्त केले. पोलिस उपनिरीक्षक संजय मोतेवार यांनी आभार मानले. 

रेमडेसिव्हर इंजेक्‍शन, औषधे द्या 

कोरोना केअर सेंटर व हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या गरीब व गरुजू रुग्णांना रेमडेसिव्हर इंजेक्‍शन व औषधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करून सोनगीरवाडीतील आझाद मंडळातर्फे दोन इंजेक्‍शन देण्याची ग्वाही उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी दिली. 

संपादन : पांडुरंग बर्गे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Dont Force Subscription In Ganeshotsav Warns Deputy Superintendent Of Police