esakal | दुष्काळी तालुक्‍यात पाऊस मोठा; तरीही जलसाठ्यात पाण्याचा तोटा
sakal

बोलून बातमी शोधा

man

माण तालुक्‍यात जलसंधारणाच्या कामांमुळे पाणी न वाहिल्याने पावसानंतरही दहापैकी सहा तलावांमधील पाणीपातळी वाढण्याऐवजी कमी झाली आहे. त्यामुळे "यंदा पाऊस आला मोठा, तरीही जलसाठ्यात पाण्याचा तोटा' अशी अवस्था पाहायला मिळत आहे. 

दुष्काळी तालुक्‍यात पाऊस मोठा; तरीही जलसाठ्यात पाण्याचा तोटा

sakal_logo
By
फिराेज तांबाेळी

गोंदवले (जि. सातारा) : गेल्या महिन्याभरापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच असल्याने सध्या तरी माण तालुक्‍यात दुष्काळ हद्दपार झाल्याचे चित्र आहे. परंतु, जलसंधारणाच्या कामांमुळे पाणी न वाहिल्याने पावसानंतरही दहापैकी तब्बल सहा तलावांमधील पाणीपातळी वाढण्याऐवजी कमी झाली आहे. त्यामुळे "यंदा पाऊस आला मोठा, तरीही जलसाठ्यात पाण्याचा तोटा' अशी अवस्था पाहायला मिळत आहे. तरीही, पुरेसा पाणीसाठा शिल्लक असल्याने समाधानाचे वातावरण आहे. 

पुरेशा पावसाअभावी सातत्याने दुष्काळी स्थिती माणमध्ये दिसत होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी जिद्द कायम ठेवून पाणीदार गाव करण्याचा ध्यास अनेक गावांनी घेतला. पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला जमिनीत थांबविण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले. याचदरम्यान उरमोडी योजनेचे पाणीही माणच्या शिवारात खेळू लागल्याने दुष्काळमुक्तीला हातभार मिळाला. मॉन्सून काळात कधी न येणारा पाऊस यंदा माणमध्येही दाखल झाला. गेल्या महिनाभरापासून कमी- अधिक प्रमाणात पावसाची ही रिपरिप सुरूच राहिल्याने पावसाचे पाणी जमिनीत साठण्यास मदत झाली. मात्र, जलस्रोत मोठ्या प्रमाणात वाहिले नसल्याने मोठ्या जलसाठ्यांमध्ये पावसाचे पाणी पोचण्यास मर्यादा आल्याचे दिसते. परिणामी काही जलसाठ्यांमध्ये वाढ झाली असली तरी काही साठ्यातील पाणी सध्या कमी झाल्याचे चित्र आहे. 

पाटबंधारेच्या अखत्यारीतील दहापैकी सहा तलावांतील पाणीपातळी पावसानंतरही कमी झाली आहे. पावसापूर्वी पुरेसा पाणीसाठा असणाऱ्या महाबळेश्वरवाडी तलावात तर सध्या केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे. राणंद तलावात मात्र पाण्याची कमालीची वाढ झाली आहे. याशिवाय लोधवडे, गंगोती व मासाळवाडी जलसाठ्यात वाढ झाली आहे. परंतु, पावसाचे पाणी न पोचल्याने आंधळी, पिंगळी, जाशी, जांभुळणी, ढाकणी या तलावांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. 

दहा तलावांत 17.57 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा 
दहा तलावांची मिळून 34.39 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा क्षमता आहे. जून महिन्यात 12.62 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता, तर सध्या 17.57 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. पुरेसा पाणीसाठा होऊनही बहुतांश तलावांमध्ये पाणीसाठा वाढण्याऐवजी कमी झाल्याचे दिसते. 

संपादन ः संजय साळुंखे 
 

महावितरण 875 व्हॉट्‌सअॅप ग्रुपव्दारे साधणार ग्राहकांशी संवाद 

loading image
go to top