खटावचा पूर्व भाग 25 वर्षे पाण्यासाठी व्याकूळ

अंकुश चव्हाण
शुक्रवार, 29 मे 2020

तारळी प्रकल्पातील पाणी मिळेल या आशेवर खटाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील जनता गेल्या 25 वर्षांपासून आसूसलेली आहे. सुमारे एक हजार 610 कोटींच्या या प्रकल्पाचा खटाववासियांना फायदा होणार तरी कधी हा प्रश्‍न विचारला जात आहे. त्यातच उरमोडी व तारळी प्रकल्पातील अधिकाऱ्यांमध्ये तारमेळ दिसत नसल्याने ऐन टंचाईत पाण्यासाठी पिकांसह नागरिकांचे हाल सुरू आहेत. 

कलेढोण (जि. सातारा) : खटावपूर्व भागाला वरदान ठरणारा तारळी प्रकल्पाच्या पाण्यासाठी गेली 25 वर्षे जनता वाट पाहात असून, हे पाणी शेतात कधी खळाळणार? एक हजार 610 दहा कोटींच्या प्रकल्पांचा फायदा खटावच्या लाभक्षेत्राला कधी मिळणार? उरमोडी व तारळी प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांच्यात केवळ ताळमेळ नसल्यानेच या पाण्यापासून जनता वंचित असल्याचा आरोप दुष्काळी जनता करीत आहे. 

खटाव व माण तालुक्‍यांतील एकूण आठ हजार 876 हेक्‍टर इतक्‍या अवर्षणप्रवण क्षेत्राला सिंचनाचा लाभ तारळी प्रकल्पामुळे मिळणार आहे. त्यासाठी आजवर चार वेळा प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. या मान्यतेमुळे प्रकल्पांतर्गत रखडलेले भूसंपादन, पुनर्वसन व 26 किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे धोंडेवाडी, मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी, अनफळे, मोराळे, मायणी व मरडवाक या गावांचा शेती पाणीप्रश्‍न मिटणार आहे. या वर्षी शेतकऱ्यांनी पाण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून पैसे भरण्याची तयारी केली. मात्र, अधिकाऱ्यांनी पुढील सूचनेअभावी हे पैसे भरायचे तरी कोठे? हा प्रश्‍न निर्माण झाल्याने पाणी शेतात खळाळले नाहीच. त्यास उरमोडी-तारळी प्रकल्पांचे अधिकारी व कालवा सल्लागार समिती ताळमेळ नसल्यामुळे पाणी मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. 

याबाबत "सकाळ'ने तारळी व उरमोडी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांच्याकडून पाणी सोडण्याबाबत दोन वेगवेगळ्या तारखा सांगण्यात आल्या. त्यामुळे तारळी व उरमोडी कालव्याच्या सल्लागार समितीत समन्वय नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. खटावपूर्व भागात शेतकरी पैसे भरण्यासाठी तयार असताना अधिकाऱ्यांची वरची लेव्हल, त्यांच्या बोलण्यातून त्यांना माणला जाणवणारी तीव्र ही जादा दिसून येत आहे. त्यामुळेच हे पाणी खटावकरांना मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. 

 

सध्या उरमोडीचे पाणी माण तालुक्‍याला देण्याचे काम सुरू आहे. कालवा सल्लागार समितीने ठरविल्याप्रमाणे सध्या पाणी सुरू आहे. एक तारखेपर्यंत आपल्याकडे (खटावला) सुटेल, अस वाटतंय. 

- राजेंद्र परुळेकर, उपअभियंता, तारळी 

सध्या माणमध्ये पाणी सुरू आहे. रोटेशन संपायला 15 दिवस लागतील. त्यानंतर वडजल-वळई राहिले आहे. खटावला पाणी देऊ शकतो. हे वरच्या लेव्हला निश्‍चित होते. त्यांनी पाणीटंचाई आहे, असे सांगितले, की निम्मे-निम्मे करून पाणी देता येइल. सध्या माणमध्ये प्रचंड दुष्काळ आहे. 

- व्ही. एस. मोळावडे, सहायक अभियंता, उरमोडी 

 

 

कॉटेजला बाबा देणार एक कोटी, कोविड मान्यता काढल्याने नामुष्की

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara The eastern part of Khatav has been in watara problem trouble for 25 years