कोरोनात अंडी, चिकन व्यवसायाला "अच्छे दिन'

पांडुरंग बर्गे 
Monday, 21 September 2020

कोरोना प्रादुर्भाव व चिकन यामध्ये कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट होऊन कोरोनावर मात करण्यासाठी पौष्टिक आहारात चिकन व अंडी यांचा वापर करण्यात यावा, असा सल्ला देण्यात येत असल्याने बाजारात अंडी व चिकनची मागणी वाढली आहे.

रहिमतपूर (जि. सातारा) : कोरोना विषाणूच्या सुरवातीला गैरसमजामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. नंतरच्या काळात कोरोनाविषयी जनजागृती होऊन चिकनविषयीचा गैरसमज दूर झाल्याने पौष्टिक आहारात अंडी व चिकनच्या वापरात लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळत आहे. परिणामी बाजारात अंड्याचा किरकोळ दर सात रुपये नग, तर चिकनचा दर 220 रुपये किलो इतका झाला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरवातीच्या काळात सोशल मीडियावरील अफवांमुळे ग्राहकांनी अंडी व चिकनकडे पाठ फिरवली होती. परिणामी बाजारपेठेतून कोंबड्यांची मागणी थांबली असल्याने जिवंत कोंबडीचा दर दहा ते 20 रुपये किलो इतक्‍या खालीपर्यंत पोचला होता. त्यातून कोंबड्यांना लागणाऱ्या खाद्याचाही खर्च निघत नसल्याने पोल्ट्री व्यावसायिकांनी अक्षरशः कोंबड्या फुकट वाटल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यामुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात येतोय की काय, असे चित्र निर्माण झाले होते. परिणामी ढासळत असलेल्या बाजारदराच्या भीतीने बऱ्याच व्यावसायिकांनी यावेळी पोल्ट्री व्यवसायामध्ये कमी प्रमाणात गुंतवणूक केल्याचे दिसून येत आहे. 

कोरोना प्रादुर्भाव व चिकन यामध्ये कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट होऊन कोरोनावर मात करण्यासाठी पौष्टिक आहारात चिकन व अंडी यांचा वापर करण्यात यावा, असा सल्ला अनेक डॉक्‍टरांकडून तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्टमधून देण्यात येत असल्याने बाजारात अंडी व चिकनची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून दरातदेखील वाढ झाली आहे. 

किरकोळ बाजारात कोरोनाच्या सुरुवातीला चिकन 100 ते 120 रुपये विकले जात होते. मागणी वाढल्याने चिकनचे दर ग्रामीण भागात 200 ते 220 पर्यंत पोचले आहेत. अंड्याचा दर पाच रुपयांवरून सात रुपये नगापर्यंत पोचला आहे. मटण 600 रुपये दराने विकले जात आहे. वाढलेल्या मटणाच्या दरामुळेही अनेकांनी चिकनला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Eggs Chicken Business Good Days During Coronas Growing Infection