खटावमधील बटाटा पीक फुलोऱ्यात, भरघोस उत्पादनाचा शेतकऱ्यांना विश्‍वास

Satara
Satara
Updated on

खटाव (जि. सातारा) : तालुक्‍यात हजारो एकर क्षेत्रात लागवड केलेला बटाटा फुलोऱ्यात आला असून, पीक स्थिती जोमात आहे. यावर्षी बटाट्याला पोषक वातावरण लाभल्याने भरघोस उत्पन्न मिळेल, असा विश्‍वास शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. 

खटाव तालुका अलीकडे कांदा, बटाटा, आल्याचे आगार म्हणून लौकिकास येत आहे. खरीप हंगामात तालुक्‍यात बटाटा हे मुख्य पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. बटाटा हे भांडवली पीक असून, प्रचंड मेहनत, भांडवल गुंतवावे लागते. थंड हवामान या पिकाला पोषक असते. मात्र, ऊन पडले की लगेच फवारणी करावी लागते. त्यातच अलीकडे बियाणे, खतांचे गगनाला भिडलेले दर, तणनाशक, जंतुनाशक फवारण्यांवर होणारा वारेमाप खर्च व एवढे करून शेवटी दर व लहरी हवामानामुळे उत्पन्नाची खात्री नसते. त्यामुळे बटाटा पीक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर जात चालल्याचे चित्र जाणवू लागले आहे. त्यातही काही शेतकरी चार पैसे मिळतील, या अपेक्षेने बटाटा लागण करतात. काही वेळेस बटाटा बियाणे खराब लागल्याच्याही तक्रारही शेतकऱ्यांमधून येतात. 

सध्या बटाटा पीक जोमात दिसत आहे. त्यामुळे एकरी 22 ते 23 टनांपर्यंत उत्पादन मिळवण्याची शेतकऱ्यांना खात्री वाटत आहे. बटाट्याला या वेळी चांगला दर मिळून बऱ्याच दिवसांतून चार पैसे शिल्लक राहण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. सध्या बाजारात खाण्याच्या बटाटासाठी ज्योती, तर बटाटा चिप्ससाठी 1533, एफसी-3, एटीएल बियाणांना अधिक मागणी आहे. या सर्व बटाटा वाणांचा कालावधी जवळपास 90 दिवसांचा असतो. बहुतांशी शेतकरी दराबाबतीत कंपनीशी करार करणे पसंत करतात. यावर्षी कंपनीने 17 च्या आसपास दर जाहीर केला आहे. आजपर्यंत लागण होऊन 35 ते 40 दिवस होऊन बटाटा भरीला आला आहे. बटाट्याला भर दिल्याने रान भसभुशीत होऊन बटाटा पोसायला मदत होत असते. या पिकाला करपा रोगापासून जास्त धोका असतो. थोडे जरी हवामान बदलले तरी लगोलग फवारणीची आवश्‍यकता असते. 


""संचारबंदीत बाजारपेठा बंद असल्याने शेतीमाल बांधावरच सडून गेला होता. परिणामी अगोदर अवसान गळून गेलेल्या बटाटा उत्पादक शेतकऱ्याला नवीन मालाला चांगला भाव मिळाला तर सावरण्याच्या आशा आहेत.'' 
-सुखदेव शिंदे, प्रगतशील शेतकरी 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com