सातारा : काटेवाडी यात्रेत तमाशा फडात मारामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fighting

सातारा : काटेवाडी यात्रेत तमाशा फडात मारामारी

बुध: काटेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामदैवत श्री मानाप्पा देवाच्या वार्षिक यात्रेतील तमाशा फडात बुध आणि फडतरवाडी (नेर) येथील युवकांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याने सहा ते सात युवक जखमी झाले. तमाशा अर्ध्यावर मोडल्याने पंचक्रोशीतील तमाशा शैाकिनांची मात्र घोर निराशा झाली.

गणगैाळणीनंतर संगीतबारी ऐन रंगात आली असतानाच एक युवक मद्यधुंद अवस्थेत नृत्यांगणाकडे विक्षीप्त हातवारे करून नाचू लागला. यात्रा कमिटीच्या लोकांनी त्यास कसे बसे शांत केले. मात्र, त्यानंतरही नृत्यांगणाच्या खासगी तंबूत जाऊन नोटा दाखवत ‘दैालतजादा’ करू लागल्याने प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात एकच गोंधळ निर्माण झाला. बाचाबाचीला सुरवात झाली. काय घडतंय हे समजायच्या आत फडतरवाडीच्या युवकांशी बुधचे तरुण भिडले. बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत झाले. लाथाबुक्क्यांनी तुफान हाणामारी सुरू झाली. हाणामारी सोडवावयास गेलेल्या गावातील तरुणांना या टोळक्याने जबर मारहाण केली. त्यानंतर फडात सर्वत्र गोंधळ आणि धुडगुस सुरू झाला. जवळच कळकाच्या बांबूनी भरलेल्या ट्रॉलीतील बांबू उपसून युवकांनी एकमेकांना मारण्यास सुरवात केली. त्यामध्ये अनेकांच्या डोक्याला जबर मार लागला.

फडतरवाडी (बुध) आणि काटेवाडी येथील युवकांमध्ये ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात हाणामारी होत आहे. एकमेकांच्या यात्रेत हाणामारी व धुडगुस घालण्याच्या युवकांच्या प्रवृत्तीला आळा बसावा, म्हणून गावोगावच्या यात्रा कमिट्यांनी ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम बंद करून त्या ठिकाणी कीर्तनांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरूवात केली. लोकवर्गणीतून यात्रेतील कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. ऑर्केस्ट्रा असो वा तमाशा प्रत्येक कार्यक्रमात युवक हमखास धुडगुस घालून संयोजकाला कार्यक्रम बंद करण्यास भाग पाडतात. रंगात आलेल्या कार्यक्रमात शिट्ट्या मारणे, टॅावेल भिरकावत उठून नाच करणे अशा युवकांच्या गैरवर्तणुकीमुळे गावोगावच्या यात्रांवर मर्यादा येऊ लागल्या आहेत.

Web Title: Satara Fighting Tamasha Phadat During Katewadi Yatra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top