सातारा तालुक्‍यात या पाच ठिकाणी कंटेनमेंट झोन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

कोरोनाचा नविन रुग्ण सापडलेल्या परिसरात त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा तातडीने शोध घ्यावा लागतो. त्यांच्या पासून इतरांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करावे लागते. त्याचबरोबर त्यांच्याकडून
इतत्र प्रसार होऊ नये यासाठी या परिसरातील लोकांच्या बाहेर पडण्यावर निर्बंध आणावे लागतात. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रांताधिकारी व इन्सीडंट कमांडर हे कंटेनमेंट झोन जाहिर करत असतात.

सातारा : कोरोनाबाधित रुग्ण बरे होणे व नव्याने रुग्ण सापडल्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सातारा तालुक्‍यात पाच नवीन कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) तयार केले आहेत.

तालुक्‍यामध्ये चोरगेवाडी, जिहे, क्षेत्र माहुली, बोरगाव व कोडोली या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या परिसरात खबरदारी घेणे आवश्‍यक बनले होते. त्यानुसार या गावांमध्ये कंटेनमेंट झोन तयार करण्याबाबत तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यानुसार त्यांनी या पाचही गावांत कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. चोरगेवाडी येथे पूर्वेला तुकाराम अण्णा यांचे घर, पश्‍चिमेला चंद्रकांत विष्णू यांचे घर, उत्तरेला जगन्नाथ चोरगे घर तर, दक्षिणेला शिवराम घोरपडे घर अशा सीमा आहेत. 

जिहे गावात पूर्वेस संदेश फणसे घर, पश्‍चिमेस महेश जाधव घर, उत्तरेला राजेंद्र फणसे घर व दक्षिणेला पोपट फडतरे घर, क्षेत्र माहुलीतील रेल्वे हॉस्पिटल परिसरात पूर्वेस रेल्वे पटरी, पश्‍चिमेस रेल्वे स्थानक रस्ता, उत्तरेला सातारा-कोरोगाव रस्ता व दक्षिणेला रेल्वे स्टेशन गार्डन, बोरगावमध्ये पूर्वेस अब्दुल हमीद घर ते कालवा पोटपाट, पश्‍चिमेला अशोक साळुंखे घर, दक्षिणेला सिंधू शेळके व गणपत शिंदे ते पोलिस ठाणे ते माळ परिसर, उत्तरेला दिलीप निकम यांचे शेत, चंदननगर कोडोली येथे पूर्वेला जानाई-मळाई रस्ता, पश्‍चिमेला आशीर्वाद अपार्टमेंट, दक्षिणेला रंजना कुरळे व उत्तरेला विजय पवार यांची मोकळी जागा अशा सीमा आहेत.

या गावींतील संबंधित परिसरच्या हद्दी सील केल्या जाणार आहेत, तसेच तेथे अत्यावश्‍यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी वगळता अन्य नागरिकांना प्रवेश करण्यास व बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याठिकाणी केवळ अत्यावश्‍यक सेवा घरपोच देण्याची व्यवस्था तयार करण्यात येणार आहे, तसेच या परिसरातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करावे, असे आवाहन श्री. मुल्ला यांनी केले आहे. 

पालकांनी मुलांशी संवाद साधला नाही तर काय घडू शकते, वाचा तेजस्वी सातपुतेंचे मत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Five New Containment Zone In Satara Taluka