पालकांनी मुलांशी संवाद साधला नाही तर काय घडू शकते, वाचा तेजस्वी सातपुतेंचे मत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

परिवर्तन संस्था व मानसरंग यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन व अवैध व्यापार विरोधी दिनानिमित्त आयोजित झूम ऍप व फेसबुक लाईव्ह या ऑनलाइन कार्यक्रमात पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते बाेलत हाेत्या.

सातारा : योग्य वेळेस मार्गदर्शन मिळण्यासाठी दु:खात किंवा ताण येतो, तेव्हा डोके टेकवण्यासाठी योग्य व्यक्‍ती घरातूनच मिळाली पाहिजे. चांगले पालक बनून आपल्या कुटुंबातील मुलांशी संवाद साधा. मार्क कमी पडले म्हणून ताण येऊन काही मुले आत्महत्येकडे, तर काही मुले व्यसनाकडे वळतात. यासाठी संवाद गरजेचा आहे, असे मत पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्‍त केले.
 
परिवर्तन संस्था व मानसरंग यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन व अवैध व्यापार विरोधी दिनानिमित्त आयोजित झूम ऍप व फेसबुक लाईव्ह या ऑनलाइन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. हमीद दाभोलकर, चंदा नवले, रूपाली पाटील, पल्लवी वनारसे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्रा. प्रमोदिनी मंडपे होत्या.
 
सातपुते म्हणाल्या, ""व्यसनाची पहिली चव तरुणपणात उत्सुकता, मित्रांचा दबावामुळे घेतली जाते. एखाद्याने घेतली नाही, तर त्याला गावाकडचा, जुन्या विचाराचा मानले जाते. आपणही करून पाहावे, या धाडसातून सुरू झालेली गोष्ट व्यसनात परिवर्तीत होण्यास वेळ लागत नाही. व्यसन हे जगण्यासाठी आवश्‍यक नाही हे लक्षात ठेवा. 
व्यसनी व्यक्‍तींच्या पत्नींनी संघर्ष करून आपल्या पतीला व्यसनातून बाहेर आणण्यास मदत तर केली; पण तिथेच न थांबता इतरांनाही तो मार्ग दाखवत त्यांना मदत करत आहेत. हा त्यांचा दातृत्वाचा गुण चांगला आहे.''
 
चंदा नवले, रूपाली पाटील यांनी आपल्या पतीच्या व्यसनामध्ये केलेला संघर्ष व त्यातून परिवर्तनच्या मदतीने त्यांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठीची केलेली धडपड सांगितली. पल्लवी नवारसे हिने वडिलांच्या व्यसनात कुटुंबातील ताण वाढले होते; पण ते व्यसनमुक्‍त झाल्यानंतर आम्ही किती समाधानी आहोत, हे सांगितले. डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यसनामुळे होणाऱ्या भयानक वास्तवतेची व सरकारच्या व्यसनविषयक असलेल्या धोरणाची जाणीव उपस्थितांना करून दिली. प्रमोदिनी मंडपे यांनी व्यसनी व्यक्‍ती वाईट नाही, व्यसन वाईट आहे. त्यामुळे त्या व्यक्‍तीला कलंकित करू नका, उपचाराच्या माध्यमातून त्याला पुन्हा उभे करता येते. हे चंदा नवले, रूपाली पाटील यांच्या अनुभवातून कळाले आहे, असे आवाहन केले.

कार्यक्रमात मानसरंग गटाचे सोहेब दड्डीकर, अश्‍विनी पाटील, राजेंद्र पवार यांनी कविता, नाट्यछटा, गाणी सादर केली. सोनाली होळी यांनी सूत्रसंचालन केले. उदय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. किशोर काळोखे यांनी आभार मानले.

प्रशासनाच्या कासव गतीने वाढविली 30 हजार युवकांची चिंता

जनतेने बाजूला केलेल्यांची नोंद कशाला घ्यायची : शरद पवार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Superintendent Of Police Tejaswi Satpute Speech In Parivartan Sanstha Program