Satara : कऱ्हाडला बिबट्याची चाळीस पिले स्वगृही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

leopards

Satara : कऱ्हाडला बिबट्याची चाळीस पिले स्वगृही

कऱ्हाड : तालुक्यातील वीसहून अधिक ठिकाणाहून बिबट्याची तब्बल चाळीस पिल्लांची तिच्या आईशी भेट घालून देण्यात वन विभागाला यश आले आहे. दीड ते दोन महिन्यांतील घटनांमध्ये बिबट्यासह रान मांजर, स्पॉटेड कॅटसारख्या दुर्मिळ प्राण्यांच्याही पिल्लांना वाचविण्यात आले आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्रांमुळे त्या प्राण्यांचा अधिवास तेथे वाढतो आहे. त्यामुळे ऊस तोड झाली, की पिले नजरेस पडत आहेत.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वगळता कऱ्हाड, पाटण तालुक्यातील नागरी वस्तीच्या भागात किती बिबटे आहेत. याची गणतीच नाही. मात्र, मागील काही दिवसांत कऱ्हाडच्या वन परिक्षेत्रात जवळपास वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचे पिलांसह रान मांजराचे पिल्लू , वाघाटी (रसटी स्पॉटेड कॅट) सापडली आहेत. त्यांना त्यांच्या आई व कुटुंबाजवळ म्हणजेच त्यांच्या मूळ अधिवासात सोडले आहे. उसाच्या शेतात तोड सुरू झाल्यावर या घटना समोर आल्या आहेत.

वनविभागाने सर्व पिल्लांना यशस्वीपणे त्यांच्या आईशी भेट घडवली आहे. बिबट्याबरोबर राहायला शिकले पाहिजे, हेही यातून स्पष्ट होते. बिबट्या अत्यंत प्रतिकूल स्थितीत स्वतःला जुळवून घेतो. त्यामुळे त्याचे वास्तव्य जंगलासह परिसरातील नागरी वस्तीत, गावांच्या आसपास व बागायती ऊस शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दिसते.

बिबट्या मानवी वस्तीच्या आजूबाजूला बिनधास्त वावरतो. कारण तो चोरटा शिकारी आहे, त्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. तो प्रतिकूल स्थितीत जुळवून घेत राहतो. जंगलात हरिण, भेकर, माकड, वानर, छोटी रानडुकर, साळींदर, ससा यांची तर नागरी वस्तीलगत शेळी, मेंढी, छोटे रेडकू, कोंबड्याची शिकार करतो. साधारणतः १० ते ५० किलोपर्यंतचे प्राणी तो मारतो. नागरी वस्तीजवळील भटका कुत्रा त्याचे सर्वात आवडीची शिकार.

अगदी प्रतिकूल परिस्थितीत बेडूक, उंदीर, घुशी, खेकडा खाऊन आपली भूक भागवतो. तो झाडावर सहज चढतो. जुन्नर खालोखाल सर्वात जास्त बिबट्यांची संख्या सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण तालुक्यांत आहे. सुमारे ३९ नवीन गाव आहेत. जेथे बिबट्याचे अस्तित्व नव्याने टिपले आहे. त्याचा तेथे वारंवार वावर दिसते आहे. ऊस शेती त्याचा अधिवास वाढवण्यास खूप पोषक ठरते आहे. मादीचा प्रजनन कालावधी वर्षभर असतो. ती साधारणपणे दोन पिलांना जन्म देते. क्वचित चार पिल्लेही होतात.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची नोंद आहे. प्रत्येक कॅमेरा ट्रॅपमध्ये तीन वेगवेगळे बिबटे दिसतात. तेवढीच बिबट्यांची संख्या कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील नागरी वस्तीतही आहे. वन्यजीव विभाग वर्षातून चार वेळा त्याची गणना करते. व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रेपमध्ये ते नोंद होतेही. मात्र, या उलट स्थिती प्रादेशिक वन विभागातील नागरी वस्तीत आहे. तेथे त्यांची मोजदादच नाही.

त्यासाठी कसलाही नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला जात नाही. भविष्यात जंगलाबाहेरील नागरी वस्तीलगत बिबट्यांची संख्येचा मोठा प्रश्न जटिल होणार आहे. मानव बिबट्या संघर्ष निर्माण करू शकतो. सुमारे दोन दशके बिबट्याने ऊसशेतीला अधिवास केले आहे. बिबट्यानेही स्वतःच्या जनुकीय बदल घडविला आहे. गर्भधारणेनंतर गर्भातच उसाचे रान हेच घर असल्याचे नवजातांना दिसते. आईही पिलांवर तेच बिंबवत असल्याने ते बिबटे ऊसशेतीतून पकडून जंगलात सोडले तरी ते पुन्हा उसाच्या रानात निवाऱ्याला येत असल्याचे दिसते.

बिबट्याला उसाच्या रानाच्या सुरक्षेसह भरपूर अन्न व मुबलक पाणी मिळते. तेच पोषक वातावरणाने त्यांची पैदास वाढते आहे. भविष्यात आपल्यासाठी ही चिंताजनक ठरणारी आहे.

- रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, कऱ्हाड.