सातारा : चार मतपत्रिका अन् ११ मतदान केंद्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

voting

सातारा : चार मतपत्रिका अन् ११ मतदान केंद्रे

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी ११ तालुक्यांतील एकूण ११ केंद्रांवर मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये सोसायटी मतदारसंघासह निवडणूक असणाऱ्या तालुक्यात मतदारांना चार मते, तर सोसायटी बिनविरोध झालेल्या तालुक्यातील मतदारांना तीन मते आणि संस्था मतदारसंघाच्या मतदारांना चार मते देण्याचा अधिकार असेल. त्यासाठी चार प्रकारच्या मतपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार विभागातील ९७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी येत्या २१ नोव्हेंबरला मतदान होत असून, एक हजार ९६७ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. बॅंकेच्या संचालकांच्या दहा जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये कऱ्हाड, जावळी, पाटण, खटाव, कोरेगाव व माण या सहा सोसायटी मतदारसंघांतून प्रत्येकी दोन, बॅंका पतसंस्था मतदारसंघातून दोन, महिला राखीवमधून चार, ओबीसी प्रवर्गातून दोन उमेदवारांचा समावेश असलेल्या एकूण दहा मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया होत आहे. हे मतदान मतपत्रिकेच्या माध्यमातून होणार असून, प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र मतपत्रिका ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये सोसायटी मतदारसंघासाठी पांढरी मतपत्रिका, महिला राखीवसाठी गुलाबी मतपत्रिका, ओबीसी मतदारसंघासाठी पिवळी, तसेच नागरी बॅंका व पतसंस्था मतदारसंघासाठी फिकट हिरव्या रंगाची मतपत्रिका असेल. ज्या मतदारसंघात सोसायटीसह मतदान आहे.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

तेथील मतदारांना चार मते द्यावी लागणार आहेत, तसेच ज्या ठिकाणी सोसायटी बिनविरोध झाली आहे. तेथील मतदारांना तीनच मते देता येतील. नागरी बॅंका व पतसंस्था मतदारसंघातील मतदारांना चार मते देता येणार आहेत. सध्या सहकार विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मतदानाचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यांना मतदानाचे प्रात्यक्षिक दाखविले जात आहे. त्यासाठी उपनिबंधक मनोहर माळी, तालुका निबंधक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर सात कर्मचारी

जिल्हा बॅंकेसाठी ११ मतदान केंद्रे असून, प्रत्येक तालुक्यात एक मतदान केंद्र आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सात कर्मचाऱ्यांची नेमणूक असेल. त्याप्रमाणे ७७ कर्मचारी हे ११ मतदान केंद्रांवर कार्यरत असतील. २० टक्के जादा राखीव कर्मचारी असे एकूण ९७ कर्मचारी सहकार विभागाने नियुक्त केले आहेत. या वेळी सर्व कर्मचारी सहकार विभागाचे नियुक्त करण्यात आले आहेत.

loading image
go to top