पाटणमध्ये लेकीनं गावकऱ्यांसाठी साकारल्या गणेशमूर्ती

राजेश पाटील
Thursday, 6 August 2020

मार्चपासून सुरू झालेले लॉकडाउन आणि शाळांना लागलेल्या सुट्यांमुळे रिकामा वेळ सत्कारणी लावण्यासाठी आई-वडिलांना शेती व घरकामात मदत करत मानेगावातील मयूरी कराळेने मोकळ्या वेळेत भावाच्या मदतीने वारुळाची माती आणून घरातच साच्यांशिवाय हाताने गणेशमूर्ती बनवल्या आहेत. 

ढेबेवाडी (जि. सातारा) : या गणेशोत्सवात मानेगाव (ता. पाटण) येथील अनेक घरांत गावच्या लेकीनं सुटीमध्ये शेतातील वारुळाच्या मातीपासून बनविलेल्या बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा होणार आहे. कारागिरीची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही तेथील मयूरी अरविंद कराळे या शाळकरी मुलीने चित्रकलेचा छंद जोपासत गावकऱ्यांसाठी साच्यांशिवाय मातीच्या मूर्ती साकारल्या आहेत. 

कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगत वसलेल्या मानेगावच्या मयूरी कराळेने गावकऱ्यांसाठी या परिवर्तनाची सुरुवात करून दिलेली आहे. मयूरी तळमावल्यातील श्री वाल्मीकी विद्यामंदिराची विद्यार्थिनी असून, यावर्षी दहावीची परीक्षा ती 81.60 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मयूरीला मूर्ती कारागिरीचा कोणताही कौटुंबिक वारसा नसतानाही चित्रकलेच्या छंदातून तिने या कलेच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. मार्चपासून सुरू झालेले लॉकडाउन आणि शाळांना लागलेल्या सुट्यांमुळे रिकामा वेळ सत्कारणी लावण्यासाठी आई-वडिलांना शेती व घरकामात मदत करत मयूरीने मोकळ्या वेळेत भावाच्या मदतीने वारुळाची माती आणून घरातच साच्यांशिवाय हाताने गणेशमूर्ती बनवायला सुरुवात केली. सिंहासनारूढ तसेच विठ्ठल व श्रीकृष्ण रूपातील दीड-दोन फुटांपर्यंतच्या आकर्षक गणेशमूर्ती तिने बनविल्या असून, ऍक्रलीकने रंगकामही सुरू केले आहे. अनेकांनी तिच्याकडील मूर्ती निश्‍चित केल्या आहेत. तिच्या कलेचे योग्य बक्षीस आम्ही तिला देऊन कौतुक करणार असल्याचे ग्रामस्थ सांगतात. 

फाईन आर्टमध्ये करिअर करायचंय 
मयूरीला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. दै."सकाळ'तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेतसह विविध स्पर्धांतून तिने बक्षिसे पटकावली आहेत. तिच्या घरातील भिंती व दरवाजांवरही तिने आकर्षक चित्रे रेखाटून घर जणू आर्ट गॅलरीच बनविले आहे. तिचे वडील अरविंद हे खासगी बसवर चालक आणि आई सुवर्णा गृहिणी आहे. मोठा भाऊ निखिल महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. सर्वांचे सहकार्य व प्रोत्साहन लाभल्याने आणि ग्रामस्थांची कौतुकाची थाप सतत पाठीवर असल्याने छंद जोपासता येत आहे. फाईन आर्टमध्ये करिअर करणार असल्याचेही ती सांगते. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

या गावात हॉस्पिटलसमोरच कोरोना बाधिताचा तडफडत मृत्यू 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Ganesh idols made by Girl for the villagers in Patan