सातारा : ‘जलजीवन’ची ३१६ गावांत कामे पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा

सातारा : ‘जलजीवन’ची ३१६ गावांत कामे पूर्ण

सातारा : जलजीवन मिशनअंतर्गत योजनेत सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३१६ गावांत पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्णत्वास आली आहेत. २४५ गावांतील कामे अंतिम टप्‍प्यात आहेत. या योजनेद्वारे प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी मिळणार असून जिल्ह्यातील सुमारे पाच लाख ७७ हजार ४३ कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.

ग्रामीण भागात पिण्याचे शुध्द व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, गावातील महिलांचा पाणी आणण्याचा त्रास कमी व्हावा, या उद्देशाने गावातील प्रत्येक घरात नळजोडणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. २०२४ पर्यंत ‘हर घर जल से नल’ हे घोषवाक्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. या योजनेतील कामासाठी केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा आहे. त्यानुसार गावोगावी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामीण भागात तर शहरी भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात पाच लाख ७७ हजार ४३ कुटुंबे असून आतापर्यंत सुमारे चार लाख ७५ हजार ६०४ कुटुंबांना नळ कनेक्शन दिली आहेत. जलजीवन मिशनमध्ये पुणे विभाग राज्यात आघाडीवर असून सातारा जिल्हा अग्रेसर आहे. याचबरोबर १७५ योजनांना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग व गटविकास अधिकाऱ्यांमार्फत निधीही वितरित केला आहे. जलजीवन मिशनमुळे जिल्ह्यातील दुर्गम व डोंगरी भागातील नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळणार आहे.

जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यात शंभर टक्के नळजोडणी केली जाणार आहे. या योजनेची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी दर आठवड्याला पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची तालुकानिहाय बैठका घेऊन योजनानिहाय सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. प्रस्तावित कामेही मार्गी लावली जात आहेत.

-विनय गौडा,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, सातारा

Web Title: Satara Jaljivan Completed In 316 Villages

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..