Satara: कऱ्हाडला भाजप, काँग्रेसचा स्वबळाला रामराम? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The corporators and supporters of the corporators  clash is karad

कऱ्हाडला भाजप, काँग्रेसचा स्वबळाला रामराम?

कऱ्हाड : पालिका आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस, भाजपसहित स्थानिक आघाड्यांकडून चाचपणी सुरू आहे. सार्वजनिक कार्यक्रमाला कधीतरीच उपस्थिती लावणारे नेते चौकाचौकात थांबून कल घेताहेत. भाजप, काँग्रेसने स्वबळाची तयारी केली असली तरी अद्यापही पक्षांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे पालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या निर्णयाला ‘यु टर्न’ बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

त्यामुळे दोन्ही पक्षांतूनही स्थानिक आघाड्यांसाठी पुढाकार घेतला जातो आहे. काँग्रेसने पक्ष निरीक्षकांच्या अहवालावर स्वबळाचा विचार होईल, असे संकेत दिले आहेत. पक्षाच्या वरिष्ठांना स्वबळाचा निर्णय कळवला आहे. त्यांचा निर्णय आल्यानंतरच स्वबळाचा विचार करणार आहोत, असे भाजपने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षीय पातळीपेक्षाही स्थानिक आघाड्यांना आता सर्वाधिक महत्त्‍व येणार आहे.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

पालिकेच्या निवडणुकीत नेहमीच पक्षापेक्षाही स्थानिक आघाड्यांना अधिक महत्त्‍व आहे. पक्ष आला की मर्यादा येतात. त्यामुळे पक्षीय झेंडे बाजूला सारून बहुतांशी वेळी स्थानिक नेत्यांच्या एकत्रीकरणाच्या आघाड्या पालिकेच्या निवडणुकीत एकमेकांसमोर असतात. कऱ्हाडच्या इतिहासात ऐतिहासिक आघाड्या यापूर्वी झाल्या आहेत. यंदा मात्र भाजपसहित काँग्रेसनेही स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. मात्र, त्या चाचपण्या संभ्रमावस्थेत आहेत. पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा रेटा असला तरी पक्षाने अद्यापही ठोस निर्णय घेतलेला नाही. पक्ष निरीक्षकांची चाचपणीसाठी नेमणूक केली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेणार असल्याचे पक्षाचे ज्येष्ठे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे पक्ष निरीक्षकांच्या अहवालाकडे तूर्त लक्ष असले तरी स्थानिक आघाड्यांसाठी पक्षातील नेत्यांनी पुढाकार घेत चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे पक्षासहित स्थानिक आघाडीसाठी होणारी चाचपणी बरेच काही सांगून जाते. भाजप कार्यकर्त्यांचाही पक्षाच्या चिन्हासाठी आग्रह आहे, त्यांची मागणी वरिष्ठांपर्यंत पोचवून त्यांच्याकडून स्वबळासाठी काय निर्णय येणार, त्यावर स्वबळाचा अंतिम निर्णय घेऊ, असे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपलाही वरिष्ठांच्या नेत्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

त्यातूनही भाजपच्या नेत्यांकडूनही स्थानिक आघाड्यांसाठी चाचपणी सुरू आहे. प्राथमिक बैठकाही पार पडल्या आहेत. पक्षापेक्षाही स्थानिक आघाड्या अत्यंत महत्त्‍वाच्या असल्याने दोन्ही पक्षांनी स्वबळाचा कितीही नारा दिला तरी त्यांना स्थानिक पातळीवरील विचार करावाच लागणार आहे. त्या दृष्टीनेच सध्या दोन्ही पक्षांची पावले उचलली जात आहेत. येणाऱ्या काळात किती स्थानिक आघाड्या, कोणत्या नेत्यांचे एकत्रीकरण होणार, ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.

स्थानिक नेत्यांकडूनही दिशाभूल

स्थानिक आघाड्यांच्या पहिल्या, दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते भाजप, काँग्रेसच्या गोटात आहेत. त्यांच्याकडूनही पक्षीय पातळीवर निवडणुकांचा आग्रह धरला जातो आहे. जेणेकरून दोन्ही पक्ष चिन्हावर लढले की, त्यांचा फायदा स्थानिक आघाड्यांना होणार असल्याचे राजकीय गणित स्पष्ट आहे. त्यामुळे स्थानिक आघाड्यांच्या अशा काही स्थानिक नेत्यांनी दोन्ही पक्षाच्या गोटात शिरून सुरू केलेला राजकीय शह-काटशहाचा डावही दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वबळासहित स्थानिक आघाड्यांसाठी चाचपणी सुरू केली आहे.

loading image
go to top