Video : 'असे' झाल्यास पूरस्थितीत एनडीआरएफच्या टीमची वाट पाहायची वेळ येणार नाही : खासदार श्रीनिवास पाटील

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

क्रेडाईने समाजसेवी उपक्रम राबवून जनतेला दिलासा देण्याचे मोठे काम केले आहे. प्रीतिसंगम हा जगातील एकमेव आहे. त्यामुळे तेथे एक चांगले पर्यटनस्थळ होईल असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केेले.

कऱ्हाड ः पूरकाळात लोकांना तातडीने मदत मिळावी, या उद्दात हेतूने क्रेडाईच्या येथील शाखेच्या वतीने रबरी बोटीचे लोकार्पण पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या उपस्थितीत येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर उत्साहात झाले. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी त्या बोटीतून नदीत फेरफटका मारला. 

क्रेडाईने लोकांसाठी पूरकाळात मदतीचा हात देण्याचे काम रबर बोट देवून केले आहे. त्यामुळे त्यांचे काम निश्‍चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्‌गार काढून पालकमंत्री पाटील म्हणाले, महापुराने मागील वर्षी मोठे नुकसान झाले. यावर्षी प्रशासनाने आवश्‍यक त्या उपाययोजना आतापासूनच राबवण्यावर भर देवून दक्षता घेतली आहे. सामाजिक संस्थांनीही पुराच्या संकटावेळी मदतीसाठी पुढे आले पाहिजे. पूर आला की पूररेषेतील लोकांना हलविण्याची गडबड सुरू होते. तत्पूर्वी पालिकेने पूररेषेतील कुटुंबांना नोटिसा देवून सजग करावे, अशा सूचनाही त्यांनी पालिकेल्या दिल्या.

खासदार पाटील म्हणाले, क्रेडाईने समाजसेवी उपक्रम राबवून जनतेला दिलासा देण्याचे मोठे काम केले आहे. प्रीतिसंगम हा जगातील एकमेव आहे. त्यामुळे तेथे एक चांगले पर्यटनस्थळ होईल. त्यासाठी पालकमंत्री पाटील व आमदार चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा. क्रेडाईने दिलेल्या बोटीचे नाव कृष्णाई ठेवावे. लोकवर्गणीतून पालिकेने पुढाकार घेऊन जास्तीत जास्त बोटी तयार ठेवाव्यात. त्यामुळे पूरस्थितीत एनडीआरएफच्या टीमची वाट पाहायची वेळ येणार नाही.
 
माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण म्हणाले, क्रेडाईने शहर व परिसरातील पूरग्रस्त गावांतील लोकांच्या सोयीसाठी रबर बोट देवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. शासनाने पुरासंदर्भात अभ्यासासाठी वडनेरे समिती नेमली. त्या समितीचा अहवाल आला आहे. नदीकाठच्या पूरग्रस्त गावांना प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच बोटी दिल्या पाहिजेत. बांधकाम करताना नैसर्गिक प्रवाह थांबणार नाही, याची दक्षता बांधकाम अभियंत्यांनी घेणे आवश्‍यक आहे.
 
यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, क्रेडाईचे अध्यक्ष धनंजय कदम, उपाध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, सदस्य उपस्थित होते.

दुकानाची भिंत फोडून 60 तोळे दागिने लंपास

बॅंक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी क्वॉरंटाईन; काेठे घडला हा प्रकार वाचा सविस्तर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Karad Credai Branch Donated Rescue Boat In Satara Disrict