Satara : कऱ्हाडला विद्यार्थ्याने घेतली कृष्णा नदीत उडी; शोध सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

Satara : कऱ्हाडला विद्यार्थ्याने घेतली कृष्णा नदीत उडी; शोध सुरूच

कऱ्हाड : कऱ्हाड- विटा मार्गावरील येथील कृष्णा पुलावरून कॉलेजच्या विद्यार्थ्याने नदीपात्रात आज दुपारी दीडच्या सुमारास उडी मारली. उडी मारलेल्या विद्यार्थ्याला नदीच्या पाण्यात बुडताना पाहिल्यानंतर काही युवकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उडी मारलेला युवक काही वेळात दिसेनासा झाला. त्यामुळे अनेक जणांनी कृष्णा पुलावर धाव घेतली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत संबंधित विद्यार्थ्याचे नाव समजू शकले नाही.

याबाबत माहिती अशी, विद्यानगर परिसरातील कॉलेज, क्लाससाठी दररोज कृष्णा पुलावरून शेकडो विद्यार्थी ये-जा करतात. आज दुपारी कॉलेजहून शहराकडे येत असलेल्या विद्यार्थ्याने कृष्णा पुलाच्या मध्यावरून नदीपत्रात उडी मारली. त्या वेळी त्याच्या पाठीमागून सायकलवरून येत असलेल्या दोघांनी हा प्रकार पाहिला.

त्यांनी त्या युवकाला हाक मारून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, न थांबता त्याने नदीत उडी घेतली. नदीपात्रात संबंधित दोन युवकांनी पाहिल्यावर तो बुडत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी पुलावरून खाली जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उडी मारणारा युवक दिसेनासा झाला होता. पुलावरून जाणाऱ्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. वाहतूक शाखेच्या पोलिसांसह इतर पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध घेतला. मात्र उशिरापर्यंत तो सापडू शकला नव्हता. रात्री उशिरापर्यंत पोलिसात याबाबत नोंद झाली नव्हती. संबंधित विद्यार्थ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.